माझ्यावर चांगल्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. कर्करोगाचे निदान माझ्यासाठीही धक्कादायकच होते पण, मी त्यातून लवकर बाहेर पडेन’, असा विश्वास अभिनेत्री मनिषा कोईरालाने व्यक्त केला आहे. मनिषाने ‘फेसबुक’च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. आपल्याला गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचेही तिने ‘फेसबुक’वर स्पष्ट केले आहे. कर्करोग झाला म्हणून मी निराश झालेले नाही. कृपा करून तुम्हीही असे समजू नका, अशी विनंतीही आपल्या चाहत्यांना केली आहे.
गेल्या आठवडय़ात मनिषा कोईरालाला तातडीने जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते मात्र, त्याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मनिषाच्या आजाराबद्दलची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांनी तिला लवकर बरे होण्यासाठी ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. आज त्या शुभेच्छांना फेसबुकच्याच माध्यमातून उत्तर देताना मनिषाने सगळ्यांना धन्यवाद दिले आहेत.
तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना आणि शुभेच्छा पाठीशी असल्याने मी लवकरच या आजारातून बाहेर पडेन. कर्क रोगाचे निदान माझ्यासाठी धक्कादायकच होते. पण, आयुष्य हे अशाच नवलाईच्या घटनांनी भरलेले असते. त्यामुळे आपण मोठय़ा विश्वासाने आणि निष्ठेने परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे,असे तिने म्हटले आहे.
सध्या मनिषा अमेरिकेत उपचार घेते आहे. ‘माझ्यावर चांगल्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्याचे परिणाम जे येतील ते येतील. मी आता त्याची चिंता करणार नाही. माझ्यापुढे सुंदर आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्यात जे होईल, ते चांगलेच असेल, या विश्वासाने माझी पुढची वाटचाल सुरू ठेवणार असल्याचेही मनिषाने सांगितले आहे.

Story img Loader