‘मन की बात’ हे प्रतीक कोल्हे यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नवं मराठी नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येत आहे.या नाटकाची निर्मिती संतोष कोल्हे यांनी केली असून या नाटकाच्या निमित्ताने दोघांचेही मराठी रंगभूमीवर प्रथमच पदार्पण होत आहे.
‘मन की बात’ ह्या नाटकातून संशयी पुरूषाच्या मनातली कुजबुज ऐकण्याची आपल्याला संधी मिळते. हे नाटक रामायणावर पूर्णपणे आधारीत नसलं तरी नाटकाचं सूत्र मात्र रामायणातल्या अग्निपरीक्षा ह्या घटनेभोवती फिरत रहातं. पुराणकाळापासून आपली पत्नी पवित्र असावी अशी भावना नवऱ्याच्या  मनात असतेच…आणि हे नाटक पण ह्याच भावनेवर आधारीत आहे. रामायणात ज्याप्रमाणे कुणाच्यातरी सांगण्यावरून रामाला सीतेची अग्निपरीक्षा घ्यावी वाटली तशीच घटना जर आज पुन्हा घडली तर काय काय होऊ शकेल?? हे आपल्याला नाटकात पहायला मिळतं. हे नाटक आजच्या काळात घडत असल्यामुळे नाटकावर सध्याच्या सोशल मिडीयाचा आणि रिअँलिटी शोज चा प्रभाव आहे. एकीकडे शरीरसुखाचे नवनवीन पर्याय उपलब्ध असताना दुसरीकडे बायकोच्या शरिरावर सत्ता गाजवणारी पुरूषी मानसिकता हे नाटक अधोरेखित करतं. त्याचप्रमाणे नवऱ्याच्या मनात बायकोविषयी संशय निर्माण करणारं तिसरं पात्र खरंच अस्तित्वात असंतं की ते पात्र नवऱ्याने त्याच्या सोयीने निर्माण केलेलं असतं ह्यावर लेखकाने प्रकाश टाकलाय. हे नाटक परिणामकारक करण्यासाठी दिग्दर्शकाने वेगवेगळ्या खेळांचा आणि नृत्याचा वापर केला आहे. ज्यामुळे हे नाटक प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन करणार नाही तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवेल. “मन की बात” या नाटकात प्रमुख भूमिकेत अक्षय शिंपी,केतकी विलास,पूर्णानंद,नम्रता सुळे,जयेश शेवलकर आणि आनंद प्रभू हे कलाकार आहेत. नाटकाचे संगीत ऋत्विक गौतमी शंकर याचे आहे तर नेपथ्य स्वप्नील टकले यांनी केले आहे.नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धेश दळवी सांभाळत आहेत.
Man Ki Baat poster
प्रतीक कोल्हे यांचे हे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पहिलेच नाटक आहे. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीमध्ये नॉन फ़्रिक्शनहेड म्हणून काम पहातात.टीव्ही वरच्या विविध कार्यक्रमाच्या संकल्पना आणि निर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. याआधी झी मराठी, एबीपी माझा या वाहिनीतल्या कामाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे.मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् मधून नाटकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू. “मन की बात” च्या निमित्ताने ते पहिल्यादाच लेखक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.

Story img Loader