बॉलिवूडच्या काही मातब्बर कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता मनोज वाजपेयी. चित्रपटक्षेत्रातील मनोजचं योगदान तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे पण गेल्या काही वर्षात ओटीटी क्षेत्रातही मनोज वाजपेयी हे नाव अदबीने घेतलं जात आहे. ‘फॅमिली मॅन’ या वेबसीरिजनंतर मनोज वाजपेयी यांच्या प्रसिद्धीमध्ये आणखीनच भर पडली आहे. आता मनोज पुन्हा एका आगळ्यावेगळ्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सीरिजचं नाव आहे ‘सूप’.

नेटफ्लिक्सच्या ग्लोबल फॅन इवेंटमध्ये आगामी चित्रपट आणि वेबसीरिजची घोषणा झाली त्यापैकीच एक वेबसीरिज म्हणजे ‘सूप’. यानिमित्ताने या सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हे दोघे मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सीरिजच्या निमित्ताने हे दोन तगडे कलाकार प्रथमच एकत्र काम करत आहेत.

‘सूप’च्या टीझरवरुन तरी याची कथा नेमकी काय असेल हे सांगता येणं कठीण आहे, पण ही एक सस्पेन्स मर्डर मिस्ट्री आहे. टीझरवरुन कोंकणा आणि मनोज हे काहीतरी गडबड गोंधळ करत असून एका मोठ्या प्लॅनची तयारी करताना आपल्याला दिसत आहेत. कोंकणाचं पात्र म्हणजेच स्वाती यादव हीला एक हॉटेल सुरू करायचं आणि आपल्या पतीपासून सुटकाकरून घेण्यासाठी ती तिच्या लव्हरबरोबर एक योजना तयार करते आणि मग या कथेत काही पोलिस ऑफिसर आणि खलनायक यांची एंट्री होते आणि कोंकणा मनोजचा हा प्लॅन आणखीन वेगळंच वळण घेतो असा अंदाज या टीझरवरुन लावता येऊ शकतो.

आणखी वाचा : Photos : दुबईमध्ये साजरा केला नयनताराने विग्नेशचा वाढदिवस; फोटो शेअर करत दोघे म्हणाले “आयुष्य सुंदर आहे”

या वेबसीरिजचं दिग्दर्शन अभिषेक चौबे याने केलं असून त्याने याआधी ‘इश्कीया’, ‘उडता पंजाब’, ‘सोनचिडिया’सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मनोज आणि कोंकणाच्या या ‘सूप’ला आणखीन चवदार बनवण्यासाठी नासर आणि सैयाजी शिंदेसारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या अभिनयाचा मसालाही पुरपूर वापरण्यात आला आहे. आता या ‘सूप’ची चव रसिकांच्या पसंतीस उतरेल की नाही ते लवकरच समोर येईल.सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अजूनतरी गुलदस्त्यातच ठेवली आहे.

Story img Loader