‘सत्या’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय क्राईम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं. प्रेक्षकांसोबतच समिक्षकांनी देखील या चित्रपटाची प्रचंड स्तुती केली होती. हा चित्रपट ३ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेता मनोज वाजपायी याने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
यादें सुनहरी यादें!!!एक अकेली फ़िल्म ने कितना कुछ बदल डाला !!! Thank you @RGVzoomin https://t.co/xPM4sNpZ2A
आणखी वाचा— manoj bajpayee (@BajpayeeManoj) July 3, 2020
मनोज वाजपेयी आज बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच्या करिअरची खरी सुरुवात ‘सत्या’ या चित्रपटामुळेच झाली होती. या चित्रपटात त्याने ‘भिकू म्हात्रे’ नामक एक गुन्हेगाराची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेने मनोजला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. २२ वर्षांपूर्वीच्या त्या आठवणींना मनोजने पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. “अविस्मरणीय अशा आठवणी, या एका चित्रपटाने सर्व काही बदलून टाकलं. धन्यवाद!” अशा आशयाचे ट्विट त्याने केलं आहे.
१९९८ साली प्रदर्शित झालेला ‘सत्या’ हा खऱ्या अर्थाने एक मास्टरपिस होता असं म्हटलं जातं. गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचं इतकं वास्तव चित्रण यापूर्वी कुठल्याही चित्रपटात करण्यात आलं नव्हतं. जबरदस्त पटकथा आणि अफलातून अभिनयाचे मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळते. मनोज वाजपेयीसोबतच उर्मिला मातोंडकर, परेश रावल, मकरंद देशपांडे, सौरव शुक्ला, जे. डी. चक्रवर्ती यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांचं करिअर या चित्रपटामुळे सुरु झालं. तसेच राम गोपाल वर्मा यांना देखील याच चित्रपटानं नामांकित दिग्दर्शकांच्या पक्तीत स्थान मिळवून दिलं होतं.