अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील सुपरहिट वेबसीरिज ‘द फॅमिली मॅन २’च्या यशानंतर अभिनेता मनोज वाजपेयी आता थ्रिलर फिल्म डायल १०० मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचा हा चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर रिलीज करण्यात येणार आहे. पण हा चित्रपट नक्की कधी रिलीज होणार याची तारीख मात्र जाहीर केलेली नाही. मात्र या चित्रपटाचं एक मोशल पोस्टर रिलीज करून चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आलीय.
अभिनेता मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे मोशल पोस्टर रिलीज केलंय. हे मोशन पोस्टर शेअर करताना त्याने एक कॅप्शन सुद्धा लिहिलीय. “एक कॉल आणि एक रात्र…जी संपुर्ण आयुष्य बदलवते…याचा एक मनोरंजक थ्रिलर पाहण्यासाठी तयार व्हा…भेटीला येतोय ‘डायल १००’ मधून…येत्या ऑगस्टमध्ये झी ५ वर रिलीज होतोय…” या मोशन पोस्टरमध्ये एक बंदूक दाखवण्यात आली आहे. तसंच एक गाडी दाखवण्यात आली असून चित्रपटातील मुख्य भूमिकेतील पात्र दाखवण्यात आली आहेत. यात अभिनेत्री नीना गुप्ता आणि साक्षी तन्वर या दोघी गाडी चालवत असल्याचं दिसून येतंय.
View this post on Instagram
मनोज वाजपेयीच्या ‘डायल १००’चं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील स्टार कास्ट. अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासोबत अभिनेत्री नीना गुप्ता आणि साक्षी तन्वर या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात मनोज वाजपेयी एका पोलिस अधिकाऱ्या भूमिकेत असणार आहे. एका रात्रीत घडलेल्या घटनांवर आधारित हा चित्रपट असणार आहे. यात एका कॉलमुळे चित्रपटातील पात्रांच्या आयुष्यात झालेली उलाथा-पालथ आणि त्यातला थ्रिलर पाहणं हे फार रंजक असणार आहे. ‘डायल १००’ चित्रपटाचं दिग्दर्शन रेंसिल डिसिल्वा यांनी केलंय.
अभिनेता मनोज वाजपेयी यापूर्वी झी ५ वर रिलीज झालेल्या ‘साइलेंस’ चित्रपटातून भेटीला आला होता. यात एक मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली होती. यात सुद्धा मनोज वापजेयी मर्डरचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून आला होता. मनोज वाजपेयी याने यापूर्वी अशा अनेक थ्रिलर चित्रपटांत काम केलंय. तसंच गेल्याच महिन्यात अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेल्या त्याच्या ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजला घवघवीत यश मिळालं होतं.