मोठय़ा पडद्यावरून छोटय़ा पडद्यावर स्थलांतरित होणाऱ्या बॉलिवूड कलाकारांमध्ये आणखी एक नाव सामिल झाले आहे ते मनोज वाजपेयीचे. सोनी टीव्हीवर ‘एन्काऊंटर’ या आणखी एका गुन्हेगारीवर आधारित शोचा सूत्रसंचालक म्हणून तो पडद्यावर येतो आहे. मात्र, त्याचवेळी त्याचे चित्रपट थांबलेले नाहीत. उलट, हा शो सुरू असतानाच ‘ट्रॅफिक’ आणि ‘सात उचक्के’ या दोन चित्रपटांवर काम सुरू राहणार असून बऱ्याच वर्षांनंतर तब्बू आणि माझी जोडी प्रेक्षकांना ‘सात उचक्के’ चित्रपटातून दिसेल, असे मनोज वाजपेयीने सांगितले.
सोनीवरच गुन्हेगारी विश्वावर आधारित दोन कार्यक्रम आधीच सुरू असताना तू ‘एन्काऊंटर’ सारख्या त्याच विषयावर आधारित शोचे सूत्रसंचालन करण्याचा धोका का पत्करलास?, या प्रश्नावर ‘एन्काऊंटर’चा विषय वेगळा आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पोलिस आणि गुन्हेगारांमधील चकमक हा विषय नविन नाही हे कबूल आहे. पण, या कथा पुन्हा सांगण्यामागचा उद्देश हा आहे की गुन्हेगारीचा मार्ग निवडणाऱ्यांच्या हातात सरतेशेवटी मृत्यूशिवाय काहीही येत नाही, हे कुठेतरी लोकांच्या मनात ठसले पाहिजे. अमूक एक गँगस्टर, तमूक एका भाईचा किती दबदबा होता, त्याने किती संपत्ती गोळा केली या विषयावर फार मोठय़ा चर्चा झडतात. पण, कधीकाळी पैशात लोळलेल्या गँगस्टरचा शेवटही तितकाच भयंकर असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. गुन्हेगारीचा मार्ग हा कधीही आयुष्यात योग्य मार्ग असू शकत नाही, हे या गँगस्टर्सच्या कथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असल्याचे मनोज वाजपेयीने स्पष्ट केले.
चित्रपटाच्या यशाची गणितं वेगळी असतात पण, छोटय़ा पडद्यावर नेहमीच टीआरपीच्या माध्यमातून कलाकारांच्या यशाचे मूल्यमापन केले जाते. बॉलिवूडच्या कलाकाराच्या बाबतीत तर या आकडय़ांवर फार लक्ष ठेवले जाते.. यावर मी आजपर्यंत कधीही चित्रपटाच्या यशापयशाबद्दल बोललेलो नाही. चित्रपट का पडला?, याची कधी चर्चा केली नाही. माझ्या मते चित्रपट असो किंवा मालिका त्याची यशस्विता, लोकप्रियता कशी असेल यावर कोणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांचा विचार मी करत नाही. मला ज्या गोष्टी करायला आवडतात, मनापासून कराव्याशा वाटतात त्या मी करतो. ‘एन्काऊंटर’ पहा असं मी लोकांना आवर्जून सांगेन कारण हा खरोखरच फार चांगला शो बनवण्यात आला आहे.
‘एन्काऊंटर’बरोबरच ‘सात उचक्के’ या नीरज पांडेची निर्मिती असलेल्या आपल्या चित्रपटाविषयीही तो फार उत्साहाने बोलतो. नीरज पांडे दिग्दर्शित ‘स्पेशल २६’  या चित्रपटातली त्याची भूमिका नावाजली. आता त्याचीच निर्मिती असलेल्या, संजीव शर्मा दिग्दर्शित ‘सात उचक्के’ या चित्रपटातून खूप वर्षांनंतर अभिनेत्री तब्बूबरोबर आपण काम करणार असल्याचेही त्याने सांगितले.

Story img Loader