सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे नाव खूपच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनमुळे जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. सरकारने अध्यादेश दाखवल्यानंतरही त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. आता लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येणार आहे. या चित्रपटातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. मुंबईतील काही भागांमध्येही या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील साकारणार आहे. रोहन पाटील यांच्याबरोबर या चित्रपटात सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा गोवर्धन दोलताडे यांनी लिहिली असून, निर्मितीही त्यांनीच केली आहे. २६ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २०१६ साली संपूर्ण महाराष्ट्रात भव्य मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. आता मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन, उपोषण यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.