मनोज नाइट श्यामलन हा भारतीय नावाचा संपूर्ण अमेरिकी दिग्दर्शक त्याच्या ‘सिक्स्थ सेन्स’ आणि ‘साईन्स’ या चित्रपटांनी वारेमाप गौरविला गेला. इतका की पुढल्या वीस वर्षांमध्ये त्याचा दबदबा चित्रपटसृष्टीत असेल असे भाकीत नव्वदोत्तरी दशकात वर्तविले गेले. या दोन चित्रपटांच्या यशोशिखरानंतर मात्र त्याच्या चित्रपटातील मंत्र हरवत गेला आणि ‘लेडी इन द वॉटर’पासून त्याने एकापेक्षा एक वाईट चित्रपट बनवत आपल्याबाबतचे भाकीत खोटे पाडले. ‘द हॅपनिंग’, ‘लास्ट एअरबेंडर’ या खूप सुमार चित्रपटानंतर प्रेक्षकांचे त्याच्या सिनेमाबाबतचे कुतूहल संपुष्टात आले. ‘व्हिलेज’ किंवा विल स्मिथला घेऊन केलेला ‘आफ्टर अर्थ’ या सिनेमांना आपल्या यादीतून डावलण्याकडे सर्वाचा कल होता. यंदा (आपल्याकडेही) आलेला ‘स्प्लिट’ त्याने आधी बनविलेल्या सर्व वाईट चित्रपटांची पापं धुऊन काढणारा ठरला असून, तब्बल दोन दशकांनंतर मंत्र गवसलेला श्यामलन पाहायला मिळालेला आहे.

सुरुवातीपासून या दिग्दर्शकाने रूढ चित्रप्रकारांमध्ये प्रयोग करीत रुळलेल्या डोळ्यांना आणि डोक्याला नवे काहीतरी पाहायला मिळेल यासाठी आटापिटा ठेवला. त्यामुळे भूतकथा, परिकथा, एलिअनपट, सुपरहीरोपट यांच्या असाधारण, अकल्पित आवृत्त्यांनी त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग झाला. मध्यंतरी एका लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींमध्ये भूत असणाऱ्या ‘डेव्हिल’ या रहस्यचित्रपटाची पटकथा त्याने रंगविली होती. डेव्हिलचे कौतुकही झाले होते. पण ‘स्प्लिट’ने त्याला पुन्हा पूर्वीच्या मार्गावर आणून ठेवले आहे.

‘स्प्लिट’चा विषय अजिबात नवा नाही. दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचे (मल्टिपल पर्सनल डिसॉर्डर) कित्येक सायकोलॉजिकल थ्रिलर (फाइट क्लब, मिस्टर ब्रुक्स, आयडेंटिटी) यापूर्वी यशस्वी झालेले आहेत. पण ‘स्प्लिट’मधली मांडणी आणि थरार श्यामलनच्या नियमानुसार ठरतो. चित्रपटाला सुरुवात होते एका वाढदिवसाच्या सोहळ्यातून एक वडील आपल्या क्लेअर आणि मार्सिया नावाच्या दोन तरुण मुलींना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या प्रसंगातून. या दोघी आपल्यासोबत सोहळ्यात सर्वात एकलकोंडय़ा वावरणाऱ्या केसी हिलाही घेऊन निघतात. या साध्याच प्रसंगाला भीषण वळण लागते, ते मुली गाडीत बसल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या जागी चालक म्हणून अपरिचित व्यक्ती दिसल्यानंतर. आपले अपहरण झाले आहे, हे कळायच्या आतच त्यांची रवानगी अपहरणकर्त्यांकडून मूच्र्छावस्थेत केली जाते.

त्या तिन्ही मुलींना जाग येते ती ननायक डेनिस (जेम्स मॅकअव्हॉय) याच्या तावडीत अज्ञात ठिकाणी बंदिस्त अवस्थेत. हा डेनिस साधीसुधी व्यक्ती नसून केव्हिन नावाच्या व्यक्तीच्या अंतरंगात असलेल्या तब्बल २३ व्यक्तिमत्त्वांपैकी एक िहस्र व क्रूर व्यक्ती आहे. त्यानेच या तिघींचे अपहरण केले आहे. मात्र या अपहरणानंतर तिन्ही मुलींवर अत्याचाराचे सत्र होत नाही, कारण काहीच क्षणांमध्ये अपहरणकर्त्यां डेनिसऐवजी २३ व्यक्तिमत्त्वांपैकी कोणतेही व्यक्तिमत्त्व समोर येते आणि त्यात भले-बुरे- सामान्य- असामान्य असे सारेच असल्याने अपहरण झालेल्या दोघी विचित्र वागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या अवतारानेच ढेपाळून जातात. एकलकोंडी केसी मात्र या विचित्रपणाला न बधता धीटपणे प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला सामोरी जाते.

चित्रपटाच्या कथेतील रहस्याला ताणणारी आणि त्याला अधिक धारदार करणारी केव्हिनची मानसोपचारतज्ज्ञ डॉ. फ्लेचर (बेट्टी बकली) हिची भूमिका महत्त्वाची आहे. तिच्या संवादातूनच केव्हिनच्या आजाराची पाश्र्वभूमी लक्षात येते. वर्षांनुवर्षे त्याला सल्ला देत असल्याने ती त्याच्यातल्या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाशी परिचित असते. चित्रपटात तेवीसच्या तेवीस व्यक्तिमत्त्व आकडय़ानुरूप दाखविलेली नाहीत. बाईचे कपडे परिधान करणारी पॅट्रिशिया आणि तोतरा बोलणारा नऊ वर्षांचा हेडविग या व्यक्तिमत्त्वांचा ठळक परिचय दाखविला आहे. शिवाय केविन आणि डॉ. फ्लेचर यांच्या संवादामध्ये ‘बिस्ट’ नावाच्या एका नव्या राक्षसी (चोविसाव्या) व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असल्याची चर्चाही आली आहे. फ्लेचर ही शक्यता धुडकावून लावते. केव्हिनच्या आतील व्यक्तिमत्त्वांचा समूह आणि अपहरण केलेल्या मुलींच्या प्रकाराने फ्लेचर खोटी आणि केव्हिनची शक्यता खरी ठरू पाहते आणि चित्रपट श्यामलनच्या खास प्राकृतिक वळणांवर दाखल होतो.

चित्रपटातला थरार हादेखील श्यामलनच्या संयत दृष्टिकोनातून सुरू राहतो. मानवी मनाविषयीची कथानकात आणि व्यक्तिरेखेद्वारे सुरू राहणारी चर्चा ही महत्त्वाची आहे. मानवी मनाची शक्ती किंवा हतबलता व्यक्तीच्या शरीराला कोणत्याही स्वरूपात नेऊ शकते, असा दावा इथे डॉक्टर फ्लेचर करते. अपहरण झालेल्या तिन्ही मुलींच्या मन:शक्तीत दोन टोकाचा फरक आहे. सुखवस्तू घरात वाढलेल्या आणि आनंदी वातावरण लाभलेल्या दोन मुली आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना कसा करतात आणि भीषण अत्याचाराचा आयुष्यात लहानपणापासून पाठलाग झालेली केसी आलेल्या परिस्थितीत धैर्य न गमावता पुढे जात राहते. जेम्स मॅकअव्हॉय याच्या अभिनयाने अनेक कलाकार असूनही हा सिनेमा एकपात्री बनला आहे. मनोभय आणि मनोबल यांच्या सीमारेषेवर प्रवास करणाऱ्या या चित्रपटाचा सिक्वेल नुकताच जाहीर झाला आहे. दर्जाबाबत तो या चित्रपटाचा इक्वल असला, तर श्यामलनबाबतचे वीस वर्षांपूर्वीचे भाकीत काही अंशी खरेही ठरण्याची शक्यता आहे.

Story img Loader