‘सोळा एके सोळा’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डॉ. विवेक बेळे हे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने पुढे आलेले एक यशस्वी नाटककार. एकेकाळी वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर हे प्रस्थापित यशस्वी नाटककार होते. त्यानंतर बराच काळ रत्नाकर मतकरी यांनी अधिराज्य गाजवलं. नाटकाच्या यशाची व्यावसायिक गणितं या मंडळींना साधली होती. प्रेक्षकांची नाडी त्यांना सापडली होती. ‘नाटक’ या माध्यमावर त्यांची हुकूमत होती. या लेखकांत कानेटकर आणि मतकरी सरस व उजवे ठरले. त्यांनी मराठी रंगभूमीच्या उपलब्ध अवकाशात विषय-आशय-मांडणीचे ‘प्रयोग’ केले आणि ते प्रेक्षकांच्या गळीही उतरवले. या परंपरेत फिट्ट बसेल असं आजच्या काळातलं नाव म्हणजे डॉ. विवेक बेळे! समकालीन वा सार्वकालिक विषय घेऊन त्याची चटपटीत, स्मार्ट मांडणी करण्यात त्यांचा हात धरणारा दुसरा लेखक सध्या तरी दिसत नाही. ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’सारखी त्यांची नाटकं याची साक्षीदार आहेत. त्यांचं नवं नाटक.. ‘सोळा एके सोळा’! नाटकाच्या शीर्षकापासूनच प्रेक्षकाला अचंब्यात पाडून आकर्षित करण्याचं तंत्र त्यांनी प्रारंभापासून अवलंबलेलं दिसतं. समकालीन विषय, त्याकडे पाहण्याची त्यांची वेगळी, विशिष्ट दृष्टी, नाटकातील आपल्या प्रतिपादनाच्या पुष्टय़र्थ ते करीत असलेले बिनतोड युक्तिवाद वा समर्थन, चटपटीत, स्मार्ट संवाद या त्यांच्या लेखनवैशिष्टय़ांची भूल पडली नाही असा प्रेक्षक दुर्मीळ. नाटकातून प्रबोधन, भाष्य वगैरेची अपेक्षा धरणारा प्रेक्षकही त्यांच्या गळास लागतो आणि निखळ कलावादी प्रेक्षकही त्यांच्या जाळ्यात फसतो. अशी विलक्षण जादुगिरी त्यांना वश आहे खरी.
तर.. ‘सोळा एके सोळा’! हे नाटक दोन पातळ्यांवर घडतं. एक -समकालीन विषय मांडून त्यावर भाष्य करू पाहणारं नाटकातलं नाटक. आणि पृष्ठपातळीवरचं ‘नाटका’ची सखोल चिकित्सा करणारं नाटक!
सौदामिनी पाटणकर ही नवी लेखिका आपण लिहिलेलं नवं नाटक एका यशस्वी दिग्दर्शकाला वाचून दाखवण्यासाठी एका हॉटेलात जाते. भागवत नामक निर्माते या नाटकाची निर्मिती करणार असतात. दिग्दर्शक महाशयांनी नाटक आधीच वाचलेलं आहे. परंतु ते बसवण्यापूर्वी त्यांना लेखिकेकडून त्यात काही फेरफार करून हवे आहेत. त्यासाठीची ही बैठक. दिग्दर्शक महोदय लेखिकेला कोणत्याही भ्रमात न ठेवता आपल्याला तिचं नाटक आवडलं असलं तरी त्यात बरेच घोळ आहेत, विशेषत: प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करता त्यात अनेक बदल करणे कसे गरजेचे आहे, हे स्पष्टपणे (खरं तर फटकळपणे!) सांगतात. सौदामिनीला प्रेक्षकानुनयी नाटक करण्यात रस नाही. परंतु तिची आधीची नाटकं रंगमंचावरील प्रकाशझोतात न आल्यानं ती आता काहीशी घायकुतीला आली आहे. दिग्दर्शक तिला प्रेक्षकांचा ल. सा. वि. काढून त्यातल्या ‘जे- १६’ या आसन क्रमांकावर बसणाऱ्या प्रेक्षकाच्या आवडीनिवडी आणि मानसिकतेनुसार नाटक बेतलं तरच ते यशस्वी होतं, हे आपलं अनुभवसिद्ध मत ठामपणे ऐकवतात. आणि त्या ‘जे-१६’ नंबरच्या प्रेक्षकाच्या साक्षीनंच सौदामिनीच्या नाटकाची चिरफाड, चिकित्सा सुरू होते. सौदामिनी सुरुवातीला या गोष्टीस तीव्र आक्षेप घेते. परंतु आपलं नाटक रंगभूमीवर यायचं असेल तर दिग्दर्शक महाशयांचं ऐकण्यावाचून गत्यंतर नाही, हे तिला कळून चुकतं. वाचनात ‘जे-१६’च्या बदलत्या प्रतिक्रियांनुरूप नाटकात बदल करायला दिग्दर्शक तिला भाग पाडतो.
सौदामिनीचं नाटक असतं आजच्या युवापिढीच्या व्यक्तिगत जीवनावरचं आणि सोशल मीडियावरील त्यांच्या सततच्या सक्रियतेवरचं! निशा या सतरा वर्षीय मुलीने अनिकेत या तिच्या बॉयफ्रेंडला आपल्या वाढदिवसाला बोलावलेलं असतं. परंतु दिलेल्या वेळेवर तो न आल्याने ती अस्वस्थ होते. त्याला, त्याच्या मैत्रिणींना फोन करूनही त्याचा पत्ता लागत नाही तेव्हा बेचैन होऊन ती आपल्या पोलीस खात्यातील वडिलांना अनिकेतचा शोध घ्यायला सांगते. तिचे वडील तिच्या या ‘हायपर’ होण्याला काहीएक अर्थ नाही, हे ते तिला समजावू पाहतात. पण ती हट्टी असल्याने अखेरीस नाइलाजानं ते आपल्या एका सहकाऱ्याला अनिकेतचा शोध घ्यायला सांगतात. इतक्यात निशाचा फोन वाजतो. तिला तिचा मित्र पंकज बातमी देतो, की अनिकेतनं फेसबुकवर आपलं स्टेटस ‘सिंगल’ झाल्याचं टाकलं आहे! निशासाठी हा जबर धक्का असतो. ज्याच्या प्रेमाच्या खरेखोटेपणाची गेले वर्षभर तिने सोशल मीडियावर कडक ‘परीक्षा’ घेऊन खातरजमा करून घेतली होती, त्या अनिकेतनं आपल्याला साधी ‘हिंट’ही न देता असं आपल्या आयुष्यातून अचानक बेदखल करावं? या बातमीची आता सोशल मीडियावरून गावभर खमंग चर्चा होणार. अनिकेतनं आपल्याला डच्चू दिला! आपली आता बेअब्रू होणार!! तिचं डोकं भणभणून जातं.
..आणि इतक्यात दस्तुरखुद्द अनिकेत साक्षात् तिथे हजर होतो. निशाला काहीच कळेनासं होतं. त्याचं फेसबुक स्टेटस खरं की आपल्यासमोर साक्षात् हजर असलेला हा अनिकेत खरा?
..हळूहळू नाटकानं वेग घेतला होता. दिग्दर्शक महाशय ‘जे-१६’च्या नाटकातील गुंतणुकीनं खूश होते. वाचन पुढे सरकतं..
डॉ. विवेक बेळे यांनी दोन पातळ्यांवर खेळवलेलं हे नाटक प्रेक्षकाला चांगलंच खिळवून ठेवतं. जसजसं ते पुढे सरकतं तसं नाटकधंदा, त्यातल्या खाचाखोचा, त्याची गणितं, प्रेक्षक-नाटककर्ते नातं अशा अनेक कंगोऱ्यांना स्पर्श करत, त्याबद्दलची मार्मिक चिकित्सा करत, ‘यशस्वी’ नाटक कसं असावं याचे खरे-खोटे ठोकताळे उकलत जातात. त्याचवेळी समांतरपणे नाटकातील नाटकात युवापिढीचं सोशल मीडियाच्या अति आहारी जाणं आणि त्याचे त्यांच्या जगण्यावर होणारे परिणाम (दुष्परिणाम!) समोर येत जातात. ही सांधेजोड करताना लेखकानं इतक्या बेमालूमपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, की आपणही (पक्षी : प्रेक्षक) नकळत नाटकात गुंगून.. गुंतून जातो. ‘जे-१६’च्या मनात काय चाललंय, हे दर्शवण्यासाठी योजलेला स्पीडोमीटर या नाटकात महत्त्वाची भूमिका निभावतो. ही दोन्ही नाटकं समांतरपणे सुरू असूनही कुठंच रसभंग मात्र होत नाही. उलट, या दोन्ही गोष्टींत प्रेक्षक म्हणून आपण गुंतत जातो. लेखकाची नाटय़-व्यवसायाबद्दलची मतं, निरीक्षणं व निष्कर्ष नाटकातला गुंता वाढवयाला मदत करतात. त्यातून सध्याच्या नाटय़सृष्टीचं वास्तव प्रकट होतं. (सावधान : हे ठोकताळे सर्वस्वी अचूक आहेत असं बिलकूलच नाही.) दुसरीकडे.. युवापिढीच्या सोशल मीडियाच्या आहारी जाण्यानं आज इतकं टोक गाठलंय, की त्यावर व्यक्त होणं हेही लेखकाला तितकंच महत्त्वाचं वाटतं. या दोहोंचा सुंदर मेळ त्यांनी या नाटकात घातलेला आहे. हे करत असताना त्यांची वरपांगी मतं व्यक्त करणारी, परंतु काहीशी सुभाषितवजा वाक्यं नाटकाचं रंजनमूल्य वाढवतात. सोशल मीडियाच्या कह्य़ात गेलेली युवापिढी आणि तिचं आभासी विश्व, जगणं समजून घेण्याच्या, तिला कथित योग्य मार्गावर आणण्यासाठी धडपडणाऱ्या पालकपिढीचं दुसरं टोक गाठणं, या परस्परविरोधी उक्ती-कृतींतून हे नाटक आकाराला येत जातं.
दिग्दर्शक सुबोध पंडे यांनी नाटकाचा फोकस हलणार नाही याची पुरेपूर दक्षता प्रयोगात घेतली आहे. संहितेतल्या अनोख्या गोष्टींचा त्यांनी प्रयोगात यथायोग्यरीत्या वापर केला आहे. एलिनेशन थिअरीचा उत्तम नमुना या नाटकात अनुभवायला मिळतो. पात्ररेखाटन, त्यांच्या लकबी, प्रत्येकाची व्यक्त होण्याची शैली या सगळ्याचा विचार प्रयोगात केलेला जाणवतो. युवापिढीच्या आभासी विश्वावर मर्मभेदकरीत्या बोट ठेवत असताना एका अक्राळविक्राळ समस्येकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य नाटकाची मागणी पुरवणारं आहे. समीर सप्तीसकर यांचं पाश्र्वसंगीत व शीतल तळपदेंची प्रकाशयोजना नाटकाचा आशय गडद करते. संदीप नगरकर (रंगभूषा) आणि कैलास कळंबे (वेशभूषा) यांनी आपली जबाबदारी चोख निभावली आहे.
आनंद इंगळे यांनी खूप टक्केटोणपे खात घडलेला (की बिघडलेला?) दिग्दर्शक आणि त्यातून त्याची नाटकासंबंधी बनलेली टोकाची मतं जोरदार मांडली आहेत. त्यात पुणेरी तिरकस आगाऊपणाची मात्रा मिसळल्याने ती आणखीनच धारदार होतात. गंभीर क्षणही ते सहजतेनं जगतात. शर्वाणी पिलाई यांनी सौदामिनीच्या भूमिकेत सर्जनशील लेखिकेची तडफड, तगमग आणि प्रेक्षकानुनयाबद्दलची चीड यथार्थपणे व्यक्त केली आहे. ‘जे-१६’ या प्रेक्षकांचा माठपणा, स्वत:च्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं नाटकात शोधण्याचा त्यांचा वृथा प्रयत्न आणि त्यांचं मोबाइल व्यसन रेणुका बोधनकर यांनी वास्तवदर्शी दाखवलं आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या आजच्या युवापिढीचं अर्कचित्र अमृता देशमुख (निशा) आणि निखिल दामले (अनिकेत) यांनी अस्सल उभं केलं आहे. विवेक गोरे यांनी निशाचे पोलिसी खाक्याचे बाबा भारदस्तपणे साकारले आहेत.
सोशल मीडियाच्या व्यसनात वाहवत चाललेली युवापिढी आणि तिचं भेसूर, भयाण भवितव्य दाखवणारं आणि त्याचवेळी नाटय़-व्यवसायाची रोखठोक शल्यचिकित्सा करणारं हे नाटक दुहेरी समाधान देतं. मनोरंजन आणि प्रबोधनाचंही!