लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर आक्षेपार्ह टिप्पणी करून मन्सूर अली खान नावाचा अभिनेता चांगलाच वादात अडकला आहे. त्रिशा व मन्सूर या दोघांनीही थलपती विजयच्या लिओ या चित्रपटात काम केलं आहे, पण त्यांचे एकत्र सीन नाहीत. या चित्रपटाबद्दल पत्रकार परिषदेत मन्सूरने केलेल्या विधानामुळे तो अडचणीत सापडला आहे, कारण या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे.
मन्सूर अली खानच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे. तसेच त्याच्यावर संबंधित कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश डीजीपींना दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने याबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. “राष्ट्रीय महिला आयोग अभिनेता मन्सूर अली खानने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल चिंतेत आहे. आम्ही या प्रकरणी डीजीपींना आयपीसी कलम ५०९ बी आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत आहोत. अशी वक्तव्ये महिलांवरील अत्याचाराचे गांभीर्य घालवून टाकतात, म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करणे गरजेचे आहे,” असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मन्सूर अली खान काय म्हणाला होता?
“जेव्हा मी त्रिशाबरोबर काम करतोय, असं ऐकलं तेव्हा मला वाटलं की चित्रपटात बेडरूमचा सीन असेल. मला वाटलं मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. जसे मी माझ्या आधीच्या चित्रपटात इतर हिरोईनबरोबर केले होते. मी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही. पण या लोकांनी मला काश्मीर शेड्यूलमध्ये त्रिशाला पाहूही दिले नाही,” असं मन्सूर अली खान म्हणाला होता.
त्रिशाची प्रतिक्रिया
“नुकताच एक व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला आहे, ज्यामध्ये मन्सूर अली खान माझ्याबद्दल अतिशय अश्लील आणि घृणास्पद बोलले आहेत. मी याचा तीव्र निषेध करते. ती टिप्पणी लिंगभेद करणारी, अपमानास्पद, घृणास्पद आणि वाईट होती. त्यांनी त्यांची इच्छा बाळगावी, पण मी त्यांच्यासारख्या व्यक्तीबरोबर स्क्रीन स्पेस कधीही शेअर केली नाही याचा मला आनंद आहे. माझ्या नंतरच्या फिल्मी करिअरमध्येही कधीच काम करणार नाही याची मी काळजी घेईन. त्यांच्यासारखे लोक मानवजातीचे नाव बदनाम करतात,” असं त्रिशा म्हणाली होती.
दरम्यान, मन्सूर अली खानने केलेल्या या विधानानंतर त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. मन्सूरने केलेल्या या घाणेरड्या विधानानंतर तमिळ इंडस्ट्रीतील कलाकार त्रिशाला पाठिंबा देत आहेत. अनेकांनी मन्सूरच्या या वक्तव्याचा निषेध करत त्याच्यावर टीका केली आहे.