तामिळ अभिनेता मन्सूर अली खानने आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अखेर अभिनेत्री त्रिशाची माफी मागितली आहे. चेन्नई पोलिसांनी त्याला समन्स पाठवल्यानंतर एक दिवसानी त्याने माफी मागितली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश डीजीपींना दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी समन्स पाठवले आणि मन्सूर अली खानने माफी मागितली.
मन्सूर अली खानच्या आक्षेपार्ह विधानानंतर नादिगर संगम नावाच्या चित्रपट संस्थेने त्याच्यावर तात्पुरती बंदी घातली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खानने माफी मागण्यास नकार दिला होता. “मी माफी मागणारा वाटतो का? मीडिया माझ्या विरोधात वाट्टेल ते लिहू शकते. मी कोण आहे हे लोकांना माहीत आहे. माझ्याकडे तमिळ लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मी माफी मागणार नाही,” असं त्याने म्हटलं होतं. पण आता मात्र त्याने माफी मागितली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर तामिळमध्ये पोस्ट केली आहे.
“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा
“गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले युद्ध मी जिंकले आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व नेते, अभिनेते आणि माध्यमांचे मनःपूर्वक आभार. ज्यांनी माझी निंदा केली त्या सर्वांना माझा सलाम… पोलीस अधिकारी म्हणाले की मी जे बोललो त्यामुळे त्रिशा दुखावली गेली, मलाही वाईट वाटलं, असं मी त्यांना म्हणालो,” अशा आशयाची उपरोधिक पोस्ट शेअर करत मन्सूर अली खानने त्रिशाची माफी मागितली.
नेमकं प्रकरण काय?
त्रिशा व मन्सूरने विजय थलपतीच्या लिओ चित्रपटात काम केलं होतं, पण त्यांचे एकत्र सीन नव्हते, यावरून मन्सूरने पत्रकार परिषदेत एक विधान केलं होतं. “जेव्हा मी त्रिशाबरोबर काम करतोय, असं ऐकलं तेव्हा मला वाटलं की चित्रपटात बेडरूमचा सीन असेल. मला वाटलं मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. जसे मी माझ्या आधीच्या चित्रपटात इतर हिरोईनबरोबर केले होते. मी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही. पण या लोकांनी मला काश्मीर शेड्यूलमध्ये त्रिशाला पाहूही दिले नाही,” असं तो म्हणाला होता.
मन्सूरबरोबर कधीच काम करणार नाही – त्रिशा
“नुकताच एक व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला आहे, ज्यामध्ये मन्सूर अली खान माझ्याबद्दल अतिशय अश्लील आणि घृणास्पद बोलले आहेत. मी याचा तीव्र निषेध करते. ती टिप्पणी लिंगभेद करणारी, अपमानास्पद, घृणास्पद आणि वाईट होती. त्यांनी त्यांची इच्छा बाळगावी, पण मी त्यांच्यासारख्या व्यक्तीबरोबर स्क्रीन स्पेस कधीही शेअर केली नाही याचा मला आनंद आहे. माझ्या नंतरच्या फिल्मी करिअरमध्येही कधीच काम करणार नाही याची मी काळजी घेईन. त्यांच्यासारखे लोक मानवजातीचे नाव बदनाम करतात,” असं त्रिशाने म्हटलं होतं.