अभिनेता मन्सूर अली खानने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याच्या या आक्षेपार्ह विधानानंतर नादिगर संगम नावाच्या चित्रपट संस्थेने त्यांच्यावर तात्पुरती बंदी घातली. त्यानंतर आज (२१ नोव्हेंबर रोजी) मन्सूर अली खान याने चेन्नईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. आपण केलेल्या विधानासाठी माफी मागणार नसल्याची भूमिका खानने घेतली आहे.
मन्सूर अली खान म्हणाला, “नादिगर संगमने माझ्यावर बंदी घालून चूक केली आहे. हे प्रकरण घडल्यानंतर त्यांनी माझ्याकडे स्पष्टीकरणही मागितले नाही. त्यांनी मला फोन करायला हवा होता किंवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागायला हवे होते. चौकशी व्हायला हवी होती, पण तसं झालं नाही.” यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय.
पुढे तो म्हणाला, “माझ्याविरुद्ध केलेली कारवाई मागे घेण्यासाठी मी नादिगर संगमला चार तासांचा वेळ देतोय. मी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. पण मी माफी मागणाऱ्या व्यक्तीसारखा दिसतो का? मीडिया माझ्या विरोधात वाट्टेल ते लिहू शकते. मी कोण आहे हे लोकांना माहीत आहे. माझ्याकडे तमिळ लोकांचा पाठिंबा आहे.”
मन्सूर अली खान पुढे म्हणाला, “माध्यमांनी त्रिशाची प्रतिक्रिया प्रसिद्ध करताना आमच्या दोघांचे फोटो शेजारी लावले, ते वधू-वरांच्या फोटोसारखे दिसतात. तुम्हा सर्वांकडे माझा एक चांगला फोटो नव्हता का वापरायला? पण त्यातल्या त्यात काही फोटोंमध्ये मी छान दिसतोय.”
मन्सूर अली खानने आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आणि म्हणाला, “चित्रपटातील बलात्काराच्या सीनचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर वास्तविक बलात्कार करणे असा होतो का? सिनेमात खून करणे म्हणजे काय? तुम्ही खरंच एखाद्याचा खून करता का? थोडी अक्कल असायला हवी ना? मी काही चुकीचे बोललो नाही. मी माफी मागणार नाही.” आपण केलेल्या विधानाबद्दल माफी मागणार नाही, असं खानने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.