तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक होतंय. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.
अभिनेता नानीने ट्विट करत म्हटलं, “मी आत्ताच जय भीम चित्रपट पाहिला. सूर्या शिवकुमार सर यांच्या बद्दलचा आदर खूप वाढला. याशिवाय सेनगानी आणि राजाकन्नू या पात्रांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्यांचं कौतुक. हा अप्रतिम चित्रपट दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार.”
चित्रपट निर्माते व्यंकट प्रभू यांनीही हा चित्रपटा पाहून प्रतिक्रिया दिली. “नुकताच अमेझॉन प्राईमवर जय भीम चित्रपट पाहिला. अप्रतिम. चित्रपटाचं लेखन, निर्मिती, अभिनय सर्वच उत्तम झालंय. या चित्रपटासाठी सूर्या शिवकुमारसह टीमचे आभार.”
आमदार सौम्या यांनी देखील जय भीम चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपट पाहण्याचं आवाहन केलंय.
राजदचे आमदार प्रह्लाद यादव यांनी जय भीम चित्रपटावर ट्वीट करत म्हटलं, “जय भीम चित्रपटाने आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन मिळवलं आहे. हा चित्रपट १९९३ मधील कुडलोर घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ९.८ रेटिंग मिळालं आहे. चित्रपट निर्मात्या टीमचं अभिनंदन. जय भीम हा उत्कृष्ट चित्रपट आहे. दाक्षिणात्य सिनेमांना अधिक ताकद मिळो.”
अभिनेता सूर्यानं देखील ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच या कौतुकाने आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.