‘मार डाला..’ हे गाणे जरी शाहरूखच्या चित्रपटातले असले तरी सध्या ते गुणगुण्याची वेळ सलमान खानवर आली आहे. रमजानच्या महिन्यात शाहरूखची गळाभेट घेतल्यानंतर त्यांच्यातील भांडण संपले असले तरी मारामारी अजून संपलेली नाही. गेली चार वर्ष सातत्याने ईदचा मुहूर्त गाठण्यासाठी जीवापाड मेहनत करून चित्रपट पूर्ण करायचे आणि मग रेकॉर्डब्रेक कमाई करून आपल्याच मेहनतीची फळे चाखत बॉलिवूड का भाई कौन..सलमान भाई..अशी उत्तरे ऐकायची सवय सलमानला लागली होती. या पाश्र्वभूमीवर यंदा एवढी मेहनत करून ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करता आला नाही हे दु:ख कमी होते म्हणून की काय त्याच ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने आपल्याच ‘एक था टायगर’चे सगळे रेकॉर्ड मोडून टाकले ही गोष्ट सलमानच्या मनाला चांगलीच लागली आहे. त्याची प्रतिक्रिया त्याने ‘मार डाला..’ या शब्दांतच व्यक्त दिली. मात्र, एवढय़ावरच न थांबता सलमानने पुढच्या वर्षीची २६ जानेवारी, ईद आणि १ डिसेंबर अशा तीन महत्त्वाच्या तारखा आपल्या चित्रपटांसाठी निश्चित के ल्या आहेत.
‘बिग बॉस’च्या प्रसिध्दी कार्यक्रमात बोलताना कोणाला मारायचेच असेल तर आपल्या कामाने मारले पाहिजे, असे सांगत जसे शाहरूख आपल्याला मारून पुढे गेला.. आता तो रणबीरसारखा नवीन मुलगाही मला मारतो आहे, अशा शब्दांत आपल्या मनातली खंत व्यक्त केली. पण, दुसऱ्याच क्षणाला पुढच्या वर्षी मी पण त्यांना माझ्या चित्रपटातून मात देणार आहे, असेही सल्लूमियॉंने जाहीर केले. लगोलग त्याने सोहैल खान दिग्दर्शित ‘मेंटल’ या चित्रपटासाठी २६ जानेवारीची तारीख निश्चित केली तर साजिद नाडियादवाला दिग्दर्शित करणार असलेल्या ‘किक’साठी पुन्हा एकदा ईदची तारीख ताब्यात घेतली आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपट ठरलेल्या तारखेला प्रदर्शित करण्यासाठी सलमानची मोठी धावाधाव सुरू झाली आहे. एकीकडे मेंटलचे चित्रिकरण पूर्ण करत असतानाच ‘किक’चीही जोरदार तयारी तो करतो आहे. लगोलग प्रभूदेवा दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटासाठीही त्याने होकार दिला असून त्यासाठी डिसेंबर २०१४ चा नाताळ निश्चित करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१३ मध्ये जे गमावले आहे ते २०१४ मध्ये लागोपाठ तीन हिट चित्रपट देऊन भरून काढण्याचा सलमानचा मानस असून त्याने त्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2013 रोजी प्रकाशित
मार डाला!
‘मार डाला..’ हे गाणे जरी शाहरूखच्या चित्रपटातले असले तरी सध्या ते गुणगुण्याची वेळ सलमान खानवर आली आहे.

First published on: 18-09-2013 at 07:58 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mar dalla salman khan says kill some one by your work