गुन्हेगारी विश्व हा जगभरातील चित्रपटांसाठीचा नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. गुन्हेगारी विश्वावर अथवा कुविख्यात गुन्हेगारांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटांनी याआधी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. गुन्हेगारांचे आपापसातले संबंध, त्यांच्यातील संघर्ष, पोलिसांचा दृष्टीकोन, डावपेच, केलेल्या कारवाया आजवर अनेक सिनेमांतून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये या विषयांवर असंख्य सिनेमांची निर्मिती झाली असली तरी मराठीत मात्र क्वचितच असे विषय हाताळण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता दिग्दर्शक मकरंद देशपांडे गुन्हेगारी विश्वावर बेतलेला, ‘सॅटरडे संडे’ हा मराठी अ‍ॅक्शनपट घेऊन येत आहेत. ‘अश्विनी राहुल इंटरप्रायजेस’ या निर्मिती संस्थेच्या अश्विनी शिरसाट यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची घोषणा नुकतीच मुंबईत एका समारंभात धमाकेदार पद्धतीने करण्यात आली. निर्मात्या अश्विनी शिरसाट, लेखक दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या सोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अंडरवर्ल्डमध्ये कुविख्यात असलेले, टोळीला नको असलेले शार्प शूटर पोलिसांच्या डेथ लिस्टवर येतात. सोमवारचा सूर्योदय पहायचा असेल तर आपआपसातील दुश्मनी बाजूला ठेवून शनिवार-रविवारी एकत्र जमावे लागेल असा निरोप येतो, तो ही राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पीए कडून. त्यानंतर घडणाऱ्या रणधुमाळीत नक्की काय घडतं हे सिनेमात पहाणे मनोरंजक ठरणार आहे. चित्रपटाचे कथा लेखन दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनीच केले आहे. चित्रपटाचे संगीत स्वप्नील नाचणे यांचे असून छायाचित्रण अनिल वर्मा करणार आहेत. कला दिग्दर्शन राज राजेंद्र पाटील यांचे असून संकलक बिरेन करणार आहे. चित्रपटाचा विषय गुन्हेगारी विश्वावर बेतलेला असल्याने अर्थातच यात अ‍ॅक्शनची ‘फुल ऑन ट्रीट’ असणार आहे. चित्रपटाचे अ‍ॅक्शन डिरेक्शन दिपक व विक्रम दहिया करणार असून कार्यकारी निर्माता संतोष म्हस्के आहेत.
मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, नेहा जोशी, अमृता संत, असीम हट्टंगडी, नुपूर, संदेश आदी कलाकारांच्या भूमिका यात पहायला मिळणार आहे. अ‍ॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेल्या मकरंद देशपांडे दिग्दर्शित ‘सॅटरडे संडे’च्या चित्रीकरणास सुरवात होणार आहे.

Story img Loader