अभिनेते अजय पुरकर हे मराठी सिनेसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक आहेत. नुकतेच ते ‘सुभेदार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटात त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर आता यानंतर ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार आहेत.
अजय पुरकर यांच्या सुभेदार चित्रपटातील कामाचं सध्या सर्वत्र खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावरून नेटकरी त्यांचं काम आवडल्याचं सांगत विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर यानंतर अजय पुरकर कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक होते. तर आता त्यांच्या दाक्षिणात्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
अजय पुरकर एका तेलुगू चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून या चित्रपटातून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचं नाव आहे स्कंदा. या चित्रपटाचे दिग्दर्शक बेयापती श्रीनू यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता राम पोथिनेनी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर यात प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यात अभिनेते अजय पुरकर यांचीही झलक दिसली. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांचा कधीही न पाहिलेला अंदाज दिसत आहे. त्यामुळे आता त्यांचे चाहते या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत.