गेले काही दिवस भारतीय कुस्ती महासंघ आणि त्यावरून निर्माण झालेला तणाव चांगलाच चर्चेत आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक संजय कुमार सिंह यांनी जिंकली. संजय सिंह हे भाजपाचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. यानंतरच कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना एक धक्काच बसला.
एकूणच असोसिएशनमधील राजकारण, आंदोलनादरम्यान त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि आता समोर आलेला हा निकाल पाहता कुस्तीपटू, ऑलिंपिक व आशियाई क्रीडा स्पर्धा विजेती साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकायचा निर्णय साऱ्या मीडियासमोर घेतला. एक पत्रकार परिषदेत घेत कार्यकारिणीच्या उपस्थितीमध्ये आपण कुस्ती खेळण्यास नसल्याचं साक्षीने जाहीर केलं तेव्हापासूनच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
आणखी वाचा : आपल्या वयाला साजेशी भूमिका साकारणार शाहरुख खान; आगामी चित्रपटाबद्दल किंग खानचा मोठा खुलासा
सामान्य लोकांपासून मोठमोठे सेलिब्रिटीज या प्रकरणावर भाष्य करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध मराठी अभिनेते व कवि सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनीदेखील त्यांच्या खास अंदाजात साक्षी मलिकबद्दल भाष्य केलं आहे. कवितेच्या माध्यमातून किशोर कदम यांनी मार्मिकपणे भाष्य केलं आहे. ही कविता खालीलप्रमाणे
प्रदूषित चौक.
लक्ष्मी सरस्वती
तुळजाई रख्माई
सार्या सार्याच देवी
आपापली देवळं
नि मुर्त्या सोडून
बाहेर पडून शेवटी
एकत्र येऊन
उभ्या राहिल्या
प्रदूषित हवेच्या
स्वाभिमान चौकात
तेंव्हा समग्र स्त्रीत्व
साक्षी होत
म्हणू शकलं
हतबलपणे
कसे बसे
दोनच शब्द
आय क्विट
ही
तेंव्हाची गोष्ट ….
सौमित्र.
या कवितेबरोबरच सौमित्र यांनी साक्षीच्या बुटांचा फोटोही शेअर केला आहे. सौमित्र यांची ही कविता चांगलीच व्हायरल झाली असून लोकांच्या त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. काहींना सौमित्र यांनी घेतलेली बाजू पटली आहे तर बहुतांश लोकांनी कॉमेंट करत त्यांच्या या भूमिका घेण्यावर टीका केली आहे, दोन्ही प्रकारच्या कॉमेंट सध्या त्यांच्या या पोस्टवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौमित्र हे बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर त्यांची मतं मांडत असतात.