मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा लाडका अभिनेता म्हणून अंशुमन विचारेला ओळखले जाते. त्याच्या अभिनयाचे कायमच कौतुक केले जाते. मात्र नुकतंच अंशुमनने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने सोलापुरात घडलेल्या एका अतिशय संतापजनक कृत्यावर भाष्य केले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंशुमन विचारे हा गेल्या काही दिवसांपासून ‘वाकडी तिकडी’ या नाटकाचा दौरा करताना पाहायला मिळत आहे. गेल्या शुक्रवारी (२७ जानेवारी) या नाटकाचा दौरा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्यांग ज्येष्ठ रंगकर्मी गुरू वठारे यांनी झाडू घेऊन संपूर्ण रंगमंच झाडून काढला. याचा एक व्हिडीओ पोस्ट करत अंशुमनने प्रशासनला जाब विचारला आहे.
नेमकं प्रकरण काय?
“दिनांक 27 जानेवारी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सोलापूर बार असोसिएशनच्या स्नेहसंमेलनात अंशुमन विचारे यांची प्रमुख भूमिका असलेले वाकडी तिकडी हे नाटक माझ्या व्यवस्थापनाद्वारे आयोजित केला होता. प्रयोगाआधी सकाळी ८ वाजल्यापासून दोन शाळेचे गॅदरिंग होते. गॅदरिंग सायंकाळी ४ वाजता संपले, ५ वाजेपर्यंत एकही सफाई कर्मचारी रंगमंचावरती किंवा प्रेक्षागृहांमध्ये सफाई करण्यासाठी आलेला नव्हता.
मी चौकशी करण्यासाठी सह व्यवस्थापक श्री धनशेट्टी यांच्याकडे गेलो ते संबंधित व्यक्तींना बोलत होते. काय झाले म्हणून विचारले तेव्हा समजले त्या व्यक्तीला सफाई काम परवडत नसल्यामुळे कामगार पाठवले नव्हते. हे जेव्हा मला समजते तेव्हा मी स्वतः झाडू घेऊन रंगमंच झाडण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान एक सफाई कामगार येऊन मेकअप रूम साफसफाई करू लागला. सोलापूरची शान असलेले हे नाट्यगृह अशी अवस्था आहे. कसे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येतील, प्रशासन या नाट्यगृहाला संबंधित विभागासाठी कर्मचारी वाढवून देतील का?” असा सवाल ज्येष्ठ रंगकर्मी गुरू वठारे यांनी विचारला आहे.
त्याबरोबर अंशुमन विचारे यांनी हा व्हिडीओ शेअर करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात अंशुमन विचारे यांच्या ‘वाकडी तिकडी’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार होता. मात्र त्यादिवशी सकाळपासूनच या मंचावर शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. हे कार्यक्रम पार पडल्यानंतर मनपा व्यवस्थापनाबरोबर तेथील साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांनी हुज्जत घातली. ठेकेदाराने मला हे काम परवडत नाही, असे सांगत सफाईचे काम बंद ठेवले होते. या दोघांमधील वाद झालेला पाहून जवळच असलेले दिव्यांग ज्येष्ठ रंगकर्मी गुरू वठारे यांनी लगेचच हातात झाडू घेतला आणि सगळा मंच झाडून काढला.
गुरू वठारे यांचे हे कृत्य पाहून अंशुमन विचारे याने स्थानिक प्रशासनाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. गुरु वठारे यांनी कुठलाही विचार न करता केवळ गैरसोय होऊ नये आणि नाटकाचा प्रयोग यशस्वी पार पडावा म्हणून हा निर्णय घेतला होता. खरं तर त्यांच्या या विचारांचे आता सगळीकडून कौतुक केले जात आहे. मात्र प्रशासनाचे गलथान काम पाहून मनपाच्या कामावर ताशेरे ओढले जात आहेत. या गलथान कारभारामुळे कलाकारांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय अशी खंत सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे.