सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या दोघांचा शाही विवाह सोहळा पुण्यात नुकताच संपन्न झाला. अगदी मेहंदी, हळद ते संगीत सेरेमनी पर्यंत सगळ्याच समारंभांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात आता आणखी एक मराठमोळा अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हार्दिक आणि अक्षयाच्या पाठोपाठ अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनीही गुपचूप लग्न उरकलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. विराजस कुलकर्णीने हे फोटो शेअर करताना ‘द कुलकर्णीज’ असं कॅप्शनही दिलं आहे. आशय आणि सानिया यांच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.
याशिवाय अभिनेत्री शिवानी रांगोळेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आशय आणि सानिया यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोघंही वरमाला घालताना दिसत आहेत. दरम्यान या दोघांनीही त्यांच्या लग्नाआधीच्या कोणत्याच विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. फक्त इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांनी हळद आणि संगीत सोहळ्याचे काही व्हिडीओ शेअर केले होते. लाडघर, दापोली येथील समुद्र किनाऱ्यावर या दोघांचा विवाह सोहळा मोजकाच मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला.