आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला, विनोदी भूमिका सादर करताना आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं अशा लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच टिव्ही मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात आपल्या लाडक्या अभिनेत्याविषयी काही गोष्टी..
१. मुंबईत जन्मलेले अशोक सराफ मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले.
२. सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत.
३. अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. याबाबतचा किस्सा यांनी एका मुलाखतीत सांगितला की, ‘काही वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती माझ्याकडे बोट दाखवून हे कोण? अशी तिच्या बाबाला विचारत होती. मग तो सांगायचा की, हे अशोक सराफ आहेत. तू त्यांना अशोकमामा म्हणत जा. आणि तिने तेव्हापासून मला अशोकमामा म्हणायला सुरवात केली. त्यानंतर काही दिवसातच हळूहळू हे सर्व सेटवर पसरलं आणि मला सर्वच लोक मामा म्हणायला लागली.’
४. अशोक सराफ हे पडद्यावर प्रेक्षकांना त्यांच्या गप्पांनी आणि अफलातून विनोदबुद्धीने खळखळून हसवतात. पण त्यांना स्वत:ला मात्र जास्त गप्पा मारायला आवडत नाही. त्यांना बोलतं करावं लागतं, त्यांना स्वत:हून बोलायला आवडत नाही.
५. ‘सखाराम हवालदार’ भूमिकेने लोकप्रियता मिळवून देऊनही एकदा महालक्ष्मी एक्स्प्रेसने जनता क्लासने कोल्हापूरला जात असताना खऱ्या पोलिसांनी अशोक सराफला ओळखून काही गमतीदार कॉमेंटस् करताच अशोक सराफने तोंड पलिकडे केले व डोक्यावरून चादर घेऊन पुढचा प्रवास केला.