मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. त्यासोबतच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, नाटक क्षेत्रात काम केले आहे. नुकतंच अशोक सराफ यांनी नुकतंच मराठी सिनेसृष्टी आणि चित्रपट याबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
अशोक सराफ यांनी नुकतंच सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना सध्याच्या मराठी चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “मी गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी चित्रपट पाहिलेलाच नाही. मराठी चित्रपट हे कथानकासाठी प्रसिद्ध होते. मात्र आता त्या कथेचा सूरच कुठेतरी हरवला आहे.”
वयामध्ये १८ वर्षांचा फरक, कुटुंबियांचा विरोध; वाचा अशोक सराफ आणि निवेदिता यांची खास लव्हस्टोरी
“आज माझ्या घराच्या एका कपाटात शेकडो स्क्रिप्टसचा गठ्ठा पडलेला आहे. या स्क्रिप्टकडे मी अनेक वर्षे पाहिलेलं देखील नाही. कारण जेव्हा मला एखाद्या स्क्रिप्टबद्दल तोंडी सांगितलं जातं, तेव्हाच माझा मूड जातो. या चित्रपटाच्या कथेत दम नाही, असे सतत वाटते. त्यानंतर मग माझ्या त्या कपाटात आणखी एक स्क्रिप्ट जाऊन पडते. मी मात्र तिकडे काय दुर्लक्षच करतो”, असेही त्यांनी म्हटले.
“सध्या सिनेसृष्टीत अनेक हौसे-गवसे-नवसे अशा कथाकारांचा-दिग्दर्शक पाहायला मिळत आहे. यातील सर्वच तसे आहेत, असं म्हणता येणार नाही. पण त्यातील अनेकजण तसेच निघतात. ज्यांना केवळ अनुदानासाठी मराठी चित्रपट करायचा असतो. एखादा चित्रपट स्वत:च्या नावावर करत दिग्दर्शकाचा टेंभा मिरवायचा असतो. त्यासाठी मग थुकरट कथेवर चित्रपट करायला घ्यायचे आणि त्यामुळे मराठी सिनेसृष्टीचा दर्जा घसरवायचा. हे सर्व असे सुरु असल्याने मी गेल्या कित्येक वर्षांपासून दिग्दर्शकांना उभं करत नाही”, असेही ते म्हणाले.
“…त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे”, ७५ वा वाढदिवस साजरा करताना अशोक सराफ भावूक
“मला ज्या कथा आवडतात, पटतात त्यातच मी काम करतो. आज मराठी चित्रपटांना खरंतर चांगल्या लेखकांची, उत्तम कथाकारांची आणि जे उत्तम कथा सांगत लोकांचं निखळ मनोरंजन करु शकतात, अशा व्यक्तींची गरज आहे. मात्र आज मराठी सिनेसृष्टीत ते सगळं मागे पडत चाललंय. पण जर आपल्याला वेळीच जाग आली तर उशीर झालेला नसेल”, असा सल्लाही त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना दिला.