विनोदी भूमिका सादर करताना आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेता म्हणजे अशोक सराफ. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतंत्र ठसा उमटविला. त्यामुळे आज त्यांचे असंख्य चाहते आहेत. आजच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र अशोक सराफ  या प्लॅटफॉर्मवर कुठेच दिसले नाही. त्यामुळे त्यांचा फेसबुक, इन्स्टाग्रामवर पदार्पण करावं अशी चाहत्यांची इच्छा होती. चाहत्यांची ही इच्छा अखेर २०२० ला पूर्ण झाली आहे. अशोक सराफ यांनी इन्स्टा आणि फेसबुकवर पदार्पण केलं आहे.

अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा आगामी ‘प्रवास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने त्यांचं अकाऊंट असून इन्स्टाग्रामवर #realashoksaraf या नावाने त्यांचं खातं आहे. विशेष म्हणजे त्यांनी २ जानेवारी २०२० रोजी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत ‘हो. धनंजय माने इथेच राहतात’, असं सांगितलं


“मला बऱ्याच जणांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यास सांगितलं होतं. मात्र मीच त्यापासून लांब राहत होतो. आपण या सगळ्यापासून लांबच बरं असं मला वाटायचं. मात्र आता मित्रांच्या, चाहत्यांच्या संपर्कात राहता यावं यासाठी या प्लॅटफॉर्माचा वापर करावा असं वाटलं आणि मी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झालो”, असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

दरम्यान, अशोक सराफ व अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हे दोघंही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून बऱ्याच वर्षांनंतर ते एकत्र काम करणार आहेत.

Story img Loader