विनोद म्हटलं की भरत जाधव आणि भरत जाधव म्हटलं की विनोद, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. हाच मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. ‘स्टेपनी’ असे या चित्रपटाचे नाव असून भरत जाधव या चित्रपटात विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे. या अतरंगी नावावरूनच चित्रपटात नक्कीच वेगळे काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की आहे. आता ही ‘स्टेपनी’ कोणाची ? या प्रश्नाचं उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे. आता ‘स्टेपनी’ या चित्रपटातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी भरत जाधव चित्रपटातून दिसणार असल्यामुळे धमाल मस्ती तर होणारच.
‘स्टेपनी’ या चित्रपटची निर्मिती श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज नासीर यांनी केले असून छायांकन मुरली कृष्णा यांनी केले आहे. यासोबतच रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून राजेश एस. एस. यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. संतोष नाकट यांनी संवादाची तर देवदास भंडारे यांनी कला आणि उदय इनामती यांनी ध्वनीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाचे संकलन शशांक शाह यांनी केले असून हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.