मराठी चित्रपटसृष्टीत विविध पात्रांना अगदी जीवंत करणाऱ्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी येणारं नाव म्हणजे विजय चव्हाण. हसतमुख चेहरा, कोणही दुखावलं जाणार नाही यासाठी प्रयत्नशील असण्याची, सर्वांच्या कलाने घेण्याची त्यांची वृत्ती आणि एकंदरच कलाविश्वात असणारा वावर या साऱ्यामुळेच विजय चव्हाण आजही अनेक कलाकारांच्या मनात घर करुन होते, आहेत आणि राहतील. विजूमामा आज आपल्यात नाहीत. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि कलाविश्वात एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यातून शोक व्यक्त केला.
रंगभूमी आणि विविध चित्रपटांमध्ये विजूमामांसोबत काम केलेल्या आणि त्यांच्या ‘मोरुची मावशी’ या भूमिकेला अक्षरश: जगलेल्या अभिनेता भरत जाधवने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी संवाद साधताना विजूमामांच्या काही आठवणी सांगितल्या. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘जत्रा’, ‘खो- खो’ अशा विविध कलाकृतींच्या निमित्ताने विजय चव्हाण यांच्यासोबत काम करायला मिळाल्याबद्दल भरत स्वत:ला नशीबवान समजतो. त्याला त्यांच्यातच्या कलाकारासोबत भावलं ते त्यांच्यातलं माणूसपण.
विजय चव्हाण हे मला वडिलबंधू स्थानी होते, असं म्हणत या विश्वात जणू एखाद्या मोठ्या भावाप्रमाणेच त्यांनी मला अगदी सुरुवातीपासून सावरुन घेतलं, बऱ्याच गोष्टी शिकवल्या असं तो म्हणाला. एक सहृदय व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं, असं सांगत आजच्या घडीला आपल्या वागण्याबोलण्यात असणारा विनम्रपणाही त्यांच्यामुळेच आहे असं त्याने न विसरता सांगितलं.
‘कोणाच्याही बाबतीत कलाविश्वात कधीही वेडंवाकडं बोलणं नाही किंवा मग कोणाच्या अध्यात मध्यातही नाही असं एकंदर आयुष्य जगलेल्या विजय चव्हाण यांच्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. त्यांच्याविषयी मला विशेष आत्मियता असण्याचं एक कारण म्हणजे लालबाग- परळ, गिरणगावाशी जोडलेली त्यांची नाळ. नाटकाच्या वेळी एकदा मी हसलो होतो, तेव्हा त्यांनी एक सुरेख असा कानमंत्र मला दिला. आपण हसायचं नाही, आपण रसिकांना हसवायचं…., त्यांचा हा मंत्र खरंच खूप मोलाचा होता’, असंही भरत म्हणाला.
‘मोरुच्या मावशीची भूमिका ज्यावेळी माझ्या वाट्याला आली तेव्हा खुद्द विजूमामा यांनीच मला त्या भूमिकेसाठीची तालीम दिली होती. पदर सावरण्यापासून, ते चेहऱ्यावरील हावभाव कसे असावेत इथपर्यंत विजूमामाने बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या. त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट ही तितकीच मोलाची होती’, असं म्हणत आपल्या लाडक्या विजूमामाबद्दल काय आणि किती बोलावं अशीच भरत जाधवची अवस्था झाली होती. आज ते आपल्यात नसले तरीही कलाकृतींच्या माध्यमातून विजूमामा नक्कीच अजरामर आहेत, असं म्हणत त्याने या हसऱ्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली दिली.