अभिनेता प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होण्याआधीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यानंतर सोशल मीडियावरून या चित्रपटाच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. या चित्रपटातील प्रभास आणि सैफ यांचा लूक प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही. याशिवाय युजर्सनी या टीझरमध्ये अनेक चुका काढल्या आहेत. पण या सगळ्यात ट्रोलिंगच्या गोंधळात ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता देवदत्त नागे याचं मात्र कौतुक होताना दिसत आहे.
ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘आदिपुरुष’मध्ये अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. टीझरमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली. ज्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चाही होताना दिसत आहे. सोशल मीडियावर देवदत्त नागेच्या फिटनेसचे बरेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात त्याचे सिक्स पॅक अॅब्स पाहून चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. सर्वजण त्याच्या फिटनेसचे दिवाने झाले आहेत.
आणखी वाचा-‘आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी केली बॉयकॉटची मागणी
‘आदिपुरुष’मध्ये हनुमानची भूमिका साकारणारा देवदत्त नागे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. त्याने बऱ्याच मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्याने काही मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे. त्याने ‘जय मल्हार’ मालिकेत साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. याशिवाय ती अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटातही दिसला होता.
आणखी वाचा- “तो खिलजीसारखा दिसला तर गैर काय?” मनोज मुंतशीर यांचं ‘आदिपुरुष’मधील रावणाला समर्थन
दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण टीझर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स आणि रावणाचा लूक यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होताना दिसत आहे. सैफने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेचा लूक कोणालाच आवडलेला नाही. त्यावरून बराच वाद सुरू आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.