मराठी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रवीण तरडेंनी स्वत:ची खास ओळख निर्माण केलीय. प्रविण तरडेंच्या सिनेमांना प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळते. नुकत्याच रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘राधे- युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ या सिनेमात प्रविण तरडेंनी दगडू दादा ही एका गुंडाची भूमिका साकारली होती. मात्र ही भूमिका अत्यंत छोटी होती.

राधे सिनेमातील प्रविण तरडेंच्या भूमिकेमुळे चाहते नाराज झाल्याचा खुलासा स्वत: प्रविण तरडेंनी केलाय. न्यूज १८ शी बोलताना प्रविण यांनी या मुद्द्यावर भाष्य़ केलंय. सुपरस्टार सलमान खानसोबत नातं निर्माण करण्याची ही छोटी भूमिका स्विकारल्याचा खुलासा त्यांनी केलाय. व्यावसायिक चित्रपट आवडत नसल्याचं सांगत असतानाच प्रविण तरडे म्हणाले, “हिंदी सिनेमाच्या तुलनेत मराठी चित्रपट आशयांच्या बाबतीत अधिक चांगले आहेत.”

प्रविण तरडे यांच्या सिनेमातील भूमिकेमुळे चाहते नाराज झाल्याचं ते म्हणाले. एवढी लहान भूमिका त्यांनी का स्विकारली असा प्रश्न चाहते विचारत असल्याचं तरडे म्हणाले. ” भूमिका किती मोठी आहे हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. मला सलमान भाईसोबत नात निर्माण करायचं  होतं आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.” असं ते म्हणाले.

आणखी वाचा: “मोठ्या दु:खातून, मोठं बळ मिळतं”, रिया चक्रवर्तीची पोस्ट चर्चेत

प्रविण तरडेंनी दिग्दर्शित केलेल्या मुळशी पॅटर्न या सुपरहिट मराठी सिनेमाचा लवकरच हिंदी रिमेक येणार आहे. ‘अंतिम’ या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ” हिंदी सिनेसृष्टी आपला विषय जगासमोर मांडतेय हा खूप मोठा सन्मान आहे.” असं म्हणत तरडे यांनी आनंद व्यक्त केला. ‘अंतिम’ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.