प्रसिद्ध अभिनेते आणि वादळवाट फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालं आहे. वादळवाट ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून विलास उजवणे घराघरात पोहचले होते. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. तसंच हृदयासंबंधीचा विकार झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. विलास उजवणे यांनी मराठी मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असं कुटुंब आहे.
विलास उजवणेंच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा
विलास उजवणे यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन विश्वावरही शोककळा पसरली आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ अशा लोकप्रिय मालिकांतून विलास उजवणे यांनी अभिनय केला. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. डॉ. उजवणे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ४ एप्रिल २०२५ रोजी मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.
विलास उजवणेंच्या निधनानंतर अमोल कोल्हे यांची पोस्ट
अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ दिली. ही झुंज अखेर थांबल्याने कला विश्वातील एक अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंची पोस्ट काय?
ज्येष्ठ मराठी अभिनेते व रंगकर्मी डॉ. विलास उपाख्य नाना उजवणे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद आहे. नागपूरच्या रंग स्वानंद नाट्यसंस्थेतून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अनेक मराठी नाटके, मालिका व चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम् शांती अशी पोस्ट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
विलास उजवणे गंभीर आजाराचा सामना करत होते
गेल्या काही वर्षांपासून ते गंभीर आजाराचा सामना करत होते. काही वर्षांपूर्वी डॉ. विलास उजवणे यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्याच्या त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. या आजारपणाशी झुंज देताना डॉ. उजवणे यांना हृदयविकाराचा त्रासदेखील जाणवू लागला होता. या आजारपणात त्यांना आर्थिक अडचणींचादेखील सामना करावा लागला. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने २०२२ साली त्यांच्या एका जवळच्या मित्राने डॉ. उजवणे यांना आर्थिक मदत करण्यासाठी सोशल मीडिया पोस्टद्वारे आवाहन केले होते. त्यांचा मित्रपरिवार आणि चाहत्यांनी त्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते.