दोन वर्षं कोणाताही सण थाटात साजरा करता न आल्याने लोकांनी यावर्षी प्रत्येक सन अगदी दणक्यात साजरा केला आहे. गुढीपाडवा, गणपती, नवरात्र हे सगळे सण अगदी थाटात पार पडले. आता लोकांना वेध लागले आहेत ते दिवाळीचे. घरोघरी मोती साबणापासून फराळापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी जोरदार तयारी सुरू झाली. लहान मुलांना हा सण अधिक प्रिय असतो कारण त्यांना मनसोक्त फटाक्यांचा आनंद लुटता येतो.
फटाक्यांमुळे प्रदूषण होतं, पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो, त्यामुळे कृपया फटाके उडवू नका असा संदेश बहुदा या देशातील प्रत्येक सेलिब्रिटी देतो. फिल्मस्टार, क्रिकेटपटूपासून कित्येक मोठमोठे सेलिब्रिटी हा संदेश देतात यामुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोलही केलं जातं. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही यावरुन बऱ्याचदा ट्रोल केलं आहे.
आणखी वाचा : क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां पुन्हा चर्चेत; रेल्वे कर्मचाऱ्यांवर लावले गंभीर आरोप
मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याचाही असाच एक संदेश देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिति’च्या ‘फटाकेमुक्त दिवाळी‘ या उपक्रमासाठी जितेंद्र जोशी याने एक खास व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये त्याने फटाके न उडवण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. शिवाय लहानपणी तोसुद्धा फटाके उडवायचा पण फटाके बनवणाऱ्या फॅक्टरीवरील एक डॉक्युमेन्ट्री पाहून त्याचं मतपरिवर्तन झालं हेसुद्धा त्याने व्हिडिओच्या मध्यमातूनस सांगितलं आहे. शिवाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो जास्त फटाके फोडेल त्याच्या घरी जास्तीत जास्त लक्ष्मी येते या लोकांच्या मान्यतेवरही त्यांने या व्हिडिओमध्ये भाष्य केलं आहे.
जितेंद्र आपल्या मुलीलाही या गोष्टीपासून दूर ठेवतो असं त्याने स्पष्ट केलं आहे. शिवाय या फटाक्यांच्या आवाजामुळे प्रदूषण होतं आणि प्राणी पक्ष्यांनाही त्याचा त्रास होतो असंही त्याने यात नमूद केलं आहे. फटाक्यांसाठी लागणाऱ्या पैशांचा सदुपयोग करा आणि यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असा संदेश त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. जितेंद्र ‘गोदावरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेला ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.