गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत होता. हेमंत ढोमे, ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर अशा काही मराठी कलाकारांनी सोशल मीडिया अकाऊंटवर या टॅगसह पोस्ट केली होती. या ट्रेंडमागील नेमकं गुपित लोकांसमोर आलं आहे. ‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा पुढचा चित्रपट ‘सनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले असून #घरापासूनदूर या ट्रेंडमागचे उत्तर प्रेक्षकांना मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीझरमध्ये ललित प्रभाकर म्हणजेच ‘सनी’ शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसत असून तो पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होत आहे. असं म्हणतात, लांब गेल्यावरच आपल्या घराचं महत्त्व कळतं असाच काहीसा अनुभव सनीला येत असल्याचे या टीझरमध्ये दिसत आहे. त्याच्या मनात चाललेली ही चलबिचल नेमकी कशासाठी आहे, याचे उत्तर आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहे.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित, या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. तसेच अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी ‘सनी’चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्वनी पंडित सहनिर्माते आहेत.

‘सनी’बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, ” खरंतर ही माझीच गोष्ट आहे पण कधी ना कधी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे, अनेकदा असे होते, घरापासून दूर गेल्यावर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळते आणि कदाचीत नवी नाती, नवं जग सापडतं. आपल्या आयुष्याला नवा आकार येतो आणि आपली सर्वार्थाने वाढ होते. हेच अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न ‘सनी’मध्ये करण्यात आला आहे. संपुर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा एक मजेशीर चित्रपट आहे.”

आणखी वाचा : अभिनेता वरुण धवनने सुपरस्टार सलमान खानबद्दल केलं मोठं विधान; म्हणाला “त्याने ओटीटीवर…”

हेमंत ढोमे यांचा ‘झिम्मा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. कोविडनंतर प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटाने तिकीटबारीवर चांगलीच कमाई केली. ललित प्रभाकरच्या मध्यंतरी आलेल्या ‘मिडियम स्पायसी’ या चित्रपटालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. ‘सनी’ या चित्रपटालाही प्रेक्षक असाच उदंड प्रतिसाद देतील अशी आशा आपण नक्कीच करू शकतो.