रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून लहान-मोठय़ा भूमिका अनेक कलाकार करत असतात.  प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेले हे चेहरे वयोपरत्वे या झगमगटापासून दूर जातात. अशा कलाकारांची पुनर्भेट घडविणारे  हे पाक्षिक सदर .. 

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सादर केलेला ‘हसवा फसवी’ हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षात असेल. प्रभावळकर यांनी यात सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. कार्यक्रमात सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नाटक तोलून धरणारी ‘वाघमारे’ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांनी ती भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने खुलविली. म्हटले तर भूमिका ‘रिप्लेसमेंट’ची. कारण आधी ही भूमिका रमाकांत देशपांडे व नंतर डॉ. हेमू अधिकारी आलटून पालटून करत होते. या दोघांनाही काही कारणाने ती करणे शक्य झाले नाही आणि ती भूमिका लीलाधर कांबळी यांच्याकडे आली आणि कांबळी यांनी ती समर्थपणे पेलली.

कांबळी यांच्या कुंम्डलीत ‘रिप्लेसमेंट’चा हा योग बहुधा प्रबळ असावा. कारण व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांचा प्रवेशही ‘रिप्लेसमेंट’च्या भूमिकेतूनच झाला. अभिनेता म्हणून आपण काही करू असे कांबळी यांनाही वाटले नव्हते. पुढे कांबळी यांनी जी काही ‘नाटके’केली ती मुंबई पोर्ट ट्रस्टमधील आपली नोकरी सांभाळूनच. १९५५ मध्ये दहावी झाल्यानंतर (तेव्हा अकरावी मॅट्रिक) परीक्षा देऊन ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्टोअर डिपार्टमेंटला नोकरीला लागले आणि १९९२ मध्ये सेवेतून निवृत्त झाले. कांबळी यांचे मूळ गाव मालवणपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले रेवंडी.

‘कलावैभव’ नाटय़संस्थेचे निर्माते मोहन तोंडवळकर आणि कांबळी हे सॅण्डहर्स्ट रोड येथे ‘सोफिया मंझिल’ या एकाच चाळीत राहणारे. कलावैभवतर्फे गणेशोत्सवात विविध कार्यक्रम/नाटके सादर व्हायची. कोकणात दौरे व्हायचे. कांबळी त्या वेळी तोंडवळकरांच्या दौऱ्यात व्यवस्थापक म्हणून सहभागी असायचे. संस्थेच्या ‘नयन तुझे जादूगार’या नाटकाचा दौरा होता. काही कारणाने नाटकात काम करणारे कलाकार जयंत सावरकर यांना चिपळूण येथील प्रयोगात सहभागी होता येणार नव्हते. त्यांनी तसे तोंडवळकर यांना कळविले आणि तोंडवळकर यांनी नाटकात कांबळी यांना उभे केले. कांबळी यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले. ‘काचेचा चंद्र’ या नाटकातही काही काळ ‘रिप्लेसमेंट’ केली. पुढे कांबळी यांनी मग मागे वळून पाहिले नाही.

‘हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे ३० हून अधिक नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ अशा त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका. कांबळी यांच्या अभिनय कारकिर्दीतील  ‘फनी िथग कॉल्ड लव्ह’ हे एक महत्त्वाचे नाटक. या नाटकाने त्यांना अमराठी प्रेक्षकही ओळखायला लागले. कारण हे नाटक इंग्रजी होते. यात त्यांची ‘डिकास्टा’ ही गॅरेज मालकाची भूमिका होती.  या नाटकाचे दोनशे प्रयोग त्यांनी केले. मच्छिंद्र कांबळी यांच्याही बरोबर अनेक  नाटकांमधून कामे केली. ‘वस्त्रहरण’, ‘हसवाफसवी’या नाटकाने त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली. ‘भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या दूरचित्रवाहिन्यांवरील  मालिकांमधूनही त्यांनी काम केले. ‘बे दुणे तीन’ ही मालिका खूप लोकप्रिय ठरली आणि या मालिकेमुळे कांबळी यांना ओळख मिळाली. डॉ. श्रीराम लागू यांच्यासह सतीश दुभाषी, भक्ती बर्वे,  प्रशांत दामले, रोहिणी हट्टंगडी, मच्छिंद्र कांबळी, भारती आचरेकर, सखाराम भावे, राजा मयेकर, सुकन्या कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.

नाटक, चित्रपट किंवा दूरदर्शन मालिकांमधून छोटय़ा-मोठय़ा भूमिका वाटय़ाला आल्या तरी त्याबद्दल कांबळी यांना कधी खंत वाटली नाही आणि आज आयुष्याच्या या वळणावरही वाटत नाही. ते म्हणतात, ज्या भूमिका  माझ्या वाटय़ाला आल्या त्यात मी जीव ओतून काम केले. ही लहान आहे की मोठी आहे, याचा विचारच मी कधी केला नाही. प्रत्येक भूमिका समरसून केली. विनोदी भूमिका करतानाही ती कुठेही अश्लीलतेकडे झुकणार नाही याची काळजी घेतली. वेडेवाकडे चाळे किंवा अंगविक्षेप न करताही अभिनयाच्या सामर्थ्यांवर ती भूमिका जिवंत करता येते, तुम्ही लोकांना हसवू शकता असे मला वाटते आणि मी ते करून दाखविले आहे. आजही अनेक ओळखीचे आणि अनोळखीही प्रेक्षक जेव्हा भेटतात आणि तुमचे काम आम्ही पाहायचो, आम्हाला आवडायचे, तुमच्या देहबोलीतून किंवा फक्त बोलण्यातून तुम्ही सहज विनोद निर्मिती करायचात, असे जेव्हा सांगतात तेव्हा आनंद तर होतोच, पण प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे मन भरून येते.

कांबळी यांनी दीर्घकाळ रंगभूमीवर काम केले असले तरी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमुळे एखादा कलाकार एकाच वेळी लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे हे माध्यम प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त प्रभावी असल्याचे ते सांगतात. पण त्याच वेळी चित्रपट किंवा दूरदर्शन मालिकांमधून काम करायला लागण्यापूर्वी कलाकारांनी दीर्घकाळ नाटक केले पाहिजे. कारण नाटक हा या सगळ्याचा पाया असल्याचेही ते ठामपणे सांगतात.

कांबळी यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे ‘नाटय़संपदा’ पुरस्कृत ‘शंकर घाणेकर स्मृती पारितोषिक’ देऊन गौरविण्यात आले आहे. नाटय़ परिषदेच्याच लीला मेहता पुरस्कृत ‘रंगदेवता’ या पारितोषिकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नाटय़ परिषदेचेच चिंतामणराव कोल्हटकर यांच्या नावाचे पारितोषिकही त्यांना मिळाले आहे.

मराठी रंगभूमीवरील ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ हा कायम दुर्लक्षित  राहिल्याबद्दल त्यांना खंत वाटते. रंगभूमीवर या मंडळींचेही महत्त्वाचे योगदान असून त्यांच्या प्रश्नांकडे रंगभूमीशी संबंधित सर्वानी गंभीरपणे पाहिले पाहिजे, असेही ते सांगतात. नाटके, चित्रपट, टेलीफिल्म्स, एकांकिका, दूरदर्शनसाठी केलेली नाटके, काही नाटकांचे केलेले दिग्दर्शन असा प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या अभिनय प्रवासात ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’मधील ‘प्रा. बारटक्के’ ही भूमिका करायला मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. मी माझ्या शैलीत हा ‘प्रा. बारटक्के’ रंगविला असता, असे ते सांगतात. ‘पडदा उघडण्यापूर्वी’ हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र (शब्दांकन-महेंद्र कुरघोडे) ‘रूपरंग’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. यात त्यांनी आपल्या संपूर्ण नाटय़ कारकिर्दीचा पट उलगडला आहे.

लीलाधर कांबळी आज ७९ वर्षांचे आहेत. आता वयोपरत्वे फारसे काही स्मरणात राहात नाही, वाचलेले लक्षात राहात नाही, विसरायला किंवा मध्येच ब्लँक व्हायला होते, त्यामुळे ‘अभिनय’ करणे त्यांनी सोडून दिले आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, मालिका पाहणे, वृत्तपत्राचे वाचन करणे, संध्याकाळी घरातून खाली उतरून थोडेसे फिरून येणे यात ते रमतात. गेल्या २२ वर्षांपासून ते ठाण्यात मानपाडा परिसरात वास्तव्य करून आहेत. ‘चला हवा येऊ दे’ तसेच ‘मी सौभाग्यवती’, ‘का रे दुरावा’ या त्यांच्या आवडीच्या मालिका. त्यांच्या तीनही मुलींची लग्ने झाली असून मुलींच्या संसारात आणि जावई व नातवंडांच्या गोतावळ्यात ते आणि त्यांच्या पत्नी नीलांबरी समाधानी आहेत..

 

Story img Loader