एखाद्याच्या बोलण्यातील हुकमी शब्दावरून कधी कधी कसा विनोद निर्माण होईल काही सांगता येत नाही. शब्दांचा खेळ हीदेखिल विनोद निर्मितीमधील एक छानशी प्रक्रिया आहेच म्हणा. आता महेश कोठारेचेच बघा, अगदी धूम धडाका पासून चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रत्येक पावलावर यशस्वी ठरत जाताना त्याच्या तोंडी सतत एकच पालुपद होते, ‘डॅम इट…’ ते इतके त्याला सरावाचे झाले की, काही भूमिकांमधूनही तो पटकन बोलू लागला ‘डॅम इट…!’ चित्रपटसृष्टीला महेश कोठारेच्या या पालुपदाची सवय झाली. ‘डॅम इट!’ पण झी वाहिनीच्या एका सोहळ्यात या साऱ्याची गंमतच झाली हो. या सोहळ्यात ‘हवा आने दो’ ते ‘रंगढंग’ सादर करताना निवेदक अभिजित खांडकेकर याने झी वाहिनीवरील सर्व यशस्वी मालिकांतील कलाकारांना स्टेजवर आमंत्रित केले. ‘जय मल्हार’च्या टीमच्या बाबतीत विचार करताना मात्र त्याने निर्माता महेश कोठारेला आमंत्रित केले. मग बोलतेही केले आणि त्यातच भाऊ कदम इत्यादीनी महेशची छान फिरकी घेताना त्याला भेटवस्तू म्हणून चक्क मीठ दिले. मीठ का बरं? तर तो सतत आपले पालुपद फक्त म्हणत असतो ना… द्या मीठ (डॅम इट), द्या मीठ (डॅम इट) म्हणून…
शब्दाच्या अशा खेळाला मनमुराद दाद मिळाली हे पुन्हा वेगळे सांगायला हवे काय?

Story img Loader