Makarand Anaspure on Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर अनेकांनी या हल्ल्याविरोधी प्रतिक्रिया दिल्या. हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत. तर, करीना कपूरनेही जबाबात हल्लेखोर अत्यंत आक्रमक दिसत असल्याचं सांगितलं. त्याने घरातील कोणतीही वस्तू चोरली नाही. त्यामुळे तो नेमका कशाच्या उद्देशाने घरात शिरला होता, याबाबत पोलिसांना अद्याप माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणावर मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ते बारामती येथील कृषक प्रदर्शनात गेले असता एबीपी माझाने त्यांच्याशी संवाद साधला.
सैफवरील हल्ल्याप्रकरणी मकरंद अनासपुरे यांना विचारलं असता ते म्हणाले, अभिनेत्यांवरच काय तर कोणावरही हल्ला झाला, कोणालाही निर्घृणपणे मारलं तरी ती निषेर्धाह बाब आहे. जे दोषी आहेत, त्यांना कडक शासन झाले पाहिजे, अन्यथा कायद्याचा धाक उरणार नाही.”
महाराष्ट्राचं वातावरण तुम्हाला कसं वाटतं? असंही यावेळी त्यांना विचारण्यात आलं. त्यावर मकरंद अनासपुरे म्हणाले, सध्याचं महाराष्ट्राचं वातावरण सकारात्मककडे जावं असं वाटतं. आपला देश स्वच्छ व्हावा असं वाटत असेल तर आधी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा लागतो, आजूबाजूची माणसं सकारात्मकतेने विचार करणारी ठेवावी लागतात. जातीपातीचं विष समाजात पसरलं तर सर्वांसाठीच अत्यंत दुर्दैवी असणार आहे. त्यामुळे आपण सकारात्मक होऊया हे जास्त महत्त्वाचं आहे.”