छोट्या पडद्यावरील ‘लागिर झालं जी’ लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा अभिनेता नितिश चव्हाण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असल्याचे दिसते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे सध्या नितिश चांगलाच चर्चेत आला आहे. मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकार नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. नितिशने सुद्धा असाच व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांचे मन जिंकले आहे.
अभिनेता नितिश चव्हाणला साताऱ्यात देवसागर ढाले नावाचा गरजू मुलगा भेटला. नितिशने या मुलाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नितिश आपल्या चाहत्यांना व्हिडीओद्वारे माहिती देत म्हणाला, “या मुलाचे नाव देवसागर ढाले असे असून हा मूळचा कोल्हापूरचा आहे. साताऱ्यात हा मुलगा सुट्टीच्या दिवशी अगरबत्त्या विकण्यासाठी येतो. देवसागरला वडील नसल्यामुळे त्याची आई घरकाम करून मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावते आणि देवसागर अगरबत्त्या विकतो. सध्या तो इयत्ता नववीमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करीत आहे तुम्हाला हा मुलगा कुठेही दिसला तरी याच्याकडून नक्की अगरबत्त्या विकत घ्या आणि त्याला मदत करा.” असे आवाहन नितिशने या व्हिडीओद्वारे त्याच्या चाहत्यांना आणि सातारकरांना केले आहे. तसेच या व्हिडीओला त्याने “चाल रं गड्या तू पुढं” असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा : सारा अली खानने आई अमृता सिंहबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, “माझा चित्रपट…”
अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होत असून नितिशचे चाहते त्याचे कौतुक करीत आहेत. एका युजरने “दादा, असेच समाजकार्य करत राहा…”, तसेच इतर काही युजर्सनी “तू खऱ्या आयुष्यात फौजी नसलास तरीही आज तू या माध्यमातून देशसेवा करत आहेस…खूप छान”, “…म्हणून आम्ही तुझे फॅन्स आहोत”, “दादा तू जिंकलंस…” अशा कमेंट या व्हिडीओवर केल्या आहेत.
नितिश चव्हाणने या गरजू मुलाकडून त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्या अगरबत्त्या विकत घेतल्यामुळे देवसागर ढाले खूप खूश झाला. तसेच “कितीही काही झाले तरीही आईची जबाबदारी आणि शिक्षण सोडून नकोस” हा मोलाचा सल्ला अभिनेत्याने या मुलाला दिला.