‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजनेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. हा कार्यक्रम सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. अभिनेत्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘फू बाई फू’ कार्यक्रमात एन्ट्री केली होती. मात्र, हा कार्यक्रम फार काळ चालू शकला नाही. यानंतर प्रेक्षकांनी त्याला पुन्हा हास्यजत्रेत येण्याची विनंती केली परंतु, तसे काहीच झाले नाही त्यामुळे ओंकार भोजनेचे अनेक चाहते त्याच्यावर आजही नाराज आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “तुझं घर स्वर्गासारखं आणि बायको…” सिद्धार्थ चांदेकरच्या लंडनमधील व्हिडीओवर मिताली मयेकरने केली भन्नाट कमेंट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे प्रेक्षक आजही ओंकार भोजनेला शोमध्ये मिस करतात. त्यांना अभिनेत्याची अनुपस्थिती प्रेक्षकांना प्रकर्षाने जाणवते, याचा अनुभव अलीकडेच अभिनेत्री नम्रता संभेरावने शेअर केलेल्या पोस्टमुळे आला. नुकताच अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसाद खांडेकर आणि ओंकार भोजने यांच्यासह एक फोटो शेअर केला. या फोटोवर एका चाहत्याने केलेल्या कमेंटने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; दुबईत लॉन्च होणार ट्रेलर

नम्रता संभेरावने शेअर केलेल्या फोटोवर एका युजरने ओंकार भोजनेला उद्देशून कमेंट केली आहे. यामध्ये युजर म्हणतो, “ओंक्या तू गद्दार आहेस…तू तुझ्या सगळ्या चाहत्यांबरोबर गद्दारी केलीस. आम्ही सगळे तुला खूप मिस करतो. हास्यजत्रा हा शो का सोडलास, निदान निमिशसारखं एखाद्या स्किटसाठी तरी तू यायला हवं. एकदा परत नक्की ये…आम्हाला सर्वांना तुला पुन्हा हास्यजत्रेत पाहून खूप आनंद होईल.”

हेही वाचा : “ताली बजाती नहीं, बजवाती हूं”, सुष्मिता सेनच्या बहुचर्चित ‘ताली’ सीरिजचे पोस्टर प्रदर्शित, अभिनेत्रीच्या लुकने वेधले लक्ष

चाहत्याने केलेली कमेंट पाहून अखेर नम्रता संभेरावला मध्यस्थी करत ओंकार भोजनेची बाजू स्पष्ट करावी लागली. या युजरला उत्तर देत नम्रता म्हणाली, “प्रत्यक्षात असे काहीच नाही, त्याला नव्या गोष्टी शिकायच्या होत्या म्हणून त्याने त्याचा मार्ग निवडला. आम्ही सर्वांनी त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला सहकार्य केले.” अभिनेत्रीने मित्राची खंबीरपणे बाजू घेतल्यामुळे नेटकऱ्यांनी नम्रताचे कौतुक करत तिने दिलेल्या उत्तरावर सहमती दर्शवली.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर “हातात काही चित्रपट आणि मध्यंतरी आजारी असल्यामुळे कार्यक्रम सोडला”, असे स्पष्टीकरण ओंकार भोजनेने एका मुलाखतीत दिले होते. पण, आजही अभिनेत्याचे चाहते आणि प्रेक्षकवर्ग त्याला पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor onkar bhojane fans are upset because he left maharashtrachi hasyajatra show sva 00
Show comments