मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी या प्रसंगात कुटुंबाला धीर आणि सांत्वन देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीतेज पटवर्धन यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी त्यांचे अधिकृत निवेदन दिले आहे. प्रदीप पटवर्धन यांची घटस्फोटित पत्नी सुवर्णरेहा जाधव यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

श्रीतेज पटवर्धन यांची पोस्ट

“कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ च्या सुमारास माझे वडील कै. प्रदीप शांताराम पटवर्धन यांचे आमच्या झावबावाडी, गिरगाव येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता चंदनवाडी, गिरगाव येथील स्मशानभूमीत शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्व विधी त्यांचा एकुलता एक मुलगा या नात्याने मी उपस्थित कुटुंबियांच्या समवेत पार पाडले.

माझ्या वडिलांचे हे असे अचानक जाणे सगळ्यांसाठी धक्कादायक होते. वयाच्या ६५ व्या वर्षी सुद्धा ते अत्यंत सक्रीय होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. अगदी आदल्या दिवशीसुद्धा ते एका नाट्य स्पर्धेचे परीक्षक होते.

आमच्यावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगात, आम्हाला धीर देणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उपस्थित राहणाऱ्या सर्वांचेच आम्ही, त्यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन, माझी पत्नी निकिता पटवर्धन, माझी आई सुवर्णरेहा जाधव आणि माझे काका सुधीर पटवर्धन ऋणी आहोत.

माझ्या वडिलांचे त्यांच्या कार्यक्षेत्र आणि अभिनय यावर निस्सीम प्रेम होते. त्यांनी कायमच रंगभूमीची मनोभावे सेवा केली. त्यांचे हेच विचार आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतील, याची मला खात्री आहे. कारण द शो मस्ट गो ऑन”, अशा शब्दांत प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. नव्वदच्या दशकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्याबरोबर एकत्रित अनेक मराठी चित्रपटातून काम केले होते. अभिनेता – दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या चित्रपटातूनही प्रदीप पटवर्धन यांनी काम केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor pradeep patwardhan son shritej share emotional facebook post after father death nrp