मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत गेल्या बऱ्याच वर्षांपासून आपलं बहुमूल्य योगदान देणारा एक चिरतरुण अभिनेता म्हणजे प्रशांत दामले. प्रत्येक पिढीसोबत मिळतंजुळतं घेत सदैव हसतमुख असणाऱ्या या अभिनेत्याचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये. त्याचं कारण आहे त्यांची नात अनायरा.
दामलेंनी नुकतंच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांच्या नातीसोबतचा एक सुरेख फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेलं कॅप्शनही तसंच सुरेख आहे. ‘नात मोठी होतेय’, असं म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दामलेंच्या चेहऱ्यावरून आनंद पाहता सुख म्हणजे नक्की काय असतं, या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असावं असं म्हणायला हरकत नाही. अनायरा ही प्रशांतजींच्या मुलीची मुलगी आहे. मुख्य म्हणजे आपल्या आजोबांसोबत असल्याचा आनंद अनायराच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळत आहे.
दामलेंचा त्यांच्या नातीसोबतचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण आपला आवडता अभिनेता कोणाचातरी आजोबाही आहे ही गोष्ट बऱ्याच जणांना पहिल्यांदाच कळत आहे. ३४ वर्षांहून अधिक काळ मराठी रंगभूमीची सेवा केलेल्या या अभिनेत्याला रंगभूमीने आणि प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. सध्याच्या घडीला त्यांचा ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. १९८३ मध्ये ‘टुरटुर’ या नाटकाद्वारे त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली होती. तेव्हापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आजतागायत सुरुच आहे.
पाहा : .. हे आहेत ऑनस्क्रिन आई-वडिलांनाच डेट करणारे सेलिब्रिटी
‘प्रशांत फॅन फाऊंडेशन’द्वारे दामले समाज कार्यातही हातभार लावत आहेत. त्याशिवाय अभिनय क्षेत्रात धडपड करणाऱ्या नव्या पिढीसाठी या क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता या कलेचं शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावं, यासाठी त्यांनी पुण्यात २०१२ मध्ये ‘टी-स्कूल’ इन्स्टिट्युटची स्थापनाही केली.