‘इंडियाज गॉट लॅटेंट’ हा समय रैनाचा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोमधील एक वादग्रस्त क्लिप सर्वत्र व्हायरल झाली असून यामध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसतात. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या प्रायव्हसीबद्दल प्रश्न विचारला. हा व्हिडीओ व्हायरल होताच सध्या रणवीरवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
रणवीरच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत त्याच्यावर टीका केली केली आहे. याशिवाय सर्व स्तरांतून टीकेची झोड उठल्यावर लोकप्रिय गायक बी प्राकने रणवीरबरोबरची आगामी पॉडकास्ट मुलाखत रद्द केली आहे. तर, सोशल मीडियावर समय रैनाच्या या शोवर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. समय आणि रणवीरविरोधात एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
मराठी अभिनेता पुष्कर जोगने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत रणवीर अलाहाबादिया तसेच समय रैनाबद्दल संताप व्यक्त केला आहे. या शोमध्ये अतिशय अश्लील, अचरटपणा चालतो असा दावा पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे.
अभिनेत्याची संतप्त पोस्ट
“India’s Got Latent या समय रैनाच्या शोमध्ये अतिशय अश्लील, अचरटपणा चालतो. तुमची वैचारिक घाण महाराष्ट्रात आणू नका. नुसता फालतूपणा असतो. शिव्या, XX, XX, कितीवेळा XXX करतोस हेच चालू असतं. अरे ही कॉमेडी नाही. हा अचरटपणाचा कळस आहे. रणवीरने सुद्धा अतिशय चुकीचं विधान केलं. पण, याला कारणीभूत समय रैना आहे. माझा जाहीर निषेध… जोग बोलणार…” अशी पोस्ट शेअर करत पुष्करने समय रैनाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता NHRC ने अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठवलेल्या नोटिशीमुळे रणवीरच्या अडचणींत भर पडली आहे. युट्यूबला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पत्र लिहिलं आहे आणि हा व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तर, घडलेल्या प्रकाराबद्दल रणवीरने सुद्धा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सर्वांची जाहीर माफी मागितली आहे.