बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ हा चित्रपट सध्या सातत्यान चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी याप्रकरणी एक आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने सडेतोड उत्तर दिले आहे.
पुष्कर श्रोत्रीने नुकतंच मुंबई तक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने दीपिका पदुकोण आणि बिकीनी वादावर भाष्य केले आहे. यावेळी त्याने दीपिका पदुकोणचे समर्थन केले आहे. तसेच याबरोबरच त्याने राम कदम यांना एक चॅलेंजही दिलं आहे.
आणखी वाचा : “…तर आम्ही खपवून घेणार नाही” दीपिकाच्या भगव्या बिकिनीच्या वादावर पुष्कर श्रोत्री स्पष्टच बोलला
पुष्कर श्रोत्री काय म्हणाला?
“कोव्हिड नंतर प्रेक्षक हे चित्रपटगृहात येत नाही. एक निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मला याची धास्ती आहे. प्रेक्षकांची चित्रपटगृहात यावं आणि पूर्वीसारखं चित्रपटाचा आनंद घ्यावा यासाठी मी काय करायला हवं याचा विचार मी कायम करत असतो. कोणत्याही एका क्षुल्लक कारणावरुन कपड्याचा रंग हा असावा की तो असावा हा प्रश्न किती किरकोळ आहे. त्या गाण्यात दीपिका पदुकोणने अनेक रंगाचे कपडे घातले आहेत. सोनेरी, पिवळा, निळा, सप्तरंगी असे रंग घातलेत. त्यामुळे रंगावर प्रत्येक पक्षाचा किंवा धर्माचा हक्क असू शकत नाही.
त्यापेक्षा लोकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत करायला हवी. राम कदम असू दे किंवा आणखी कोणी राजकीय नेतेमंडळी, पक्षातील लोकांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. पण यापुढेही करायला हवी की लोकांनी चित्रपटगृहात यायला हवं. चित्रपट हे चित्रपटगृहात बघायला हवं, यासाठी आम्हाला मार्गदर्शन, मदत, पाठिंबा, प्रेम हे तुमच्याच कडून मिळायला हवं. कारण बॉयकॉट करणं हे चुकीचं आहे. आम्हाला त्याची फार भीती वाटते. आम्ही धास्तावलो आहेत. आमचे पैसे पणाला लागलेले असतात. निर्माते घरं गहाण टाकून चित्रपट बनवतात. या सर्वांना तुम्ही एका रंगासाठी बॉयकॉट करुन चित्रपट पाहू नका हे सांगणं चुकीचं आहे.
राम कदम सर तुम्ही संत महात्मांना पाठिंबा देताय ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हे गाणं पाहिलं असेल त्यात तिने विविध रंगाचे कपडे घातलेत. या एका रंगावर माझा हक्क आहे आणि हा रंग त्यांचा आहे असं आपण म्हणू शकत नाही. जर बॉयकॉट करायचा नसेल तर तुम्ही इथे जाहीरपणे सांगा की चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, जर तो तुम्हाला आवडला तर ते जाहीरपणे सांगा. तसेच जर नाही आवडला तर तुम्ही ते वाईट आहे तो बघायला जाऊ नका, असे देखील दुपटीने सांगा. पण तुम्ही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहा, असं जाहीरपणे का सांगत नाहीत?
सोशल मीडियावर सतत चर्चेत राहण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. कंपनीकडून २ जीबीचा डेटा मला फुकट मिळतोय. त्यामुळे मी लेखक, दिग्दर्शक आणि न्यायधीश झालोय, मी सांगतो म्हणून हे बॉयकॉट करा असं म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही”, असे पुष्कर श्रोत्री म्हणाला.
दरम्यान राम कदम यांनी काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाच्या वादात उडी घेतली होती. राम कदम यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात ते म्हणाले, “पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारं सरकार आहे. त्यामुळं चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी.”
साधू-संतानी जे आक्षेप घेतलेत, त्यावर त्यांचं (निर्माता-दिग्दर्शक) काय म्हणणं आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावं. महाराष्ट्रच्या भूमीवर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही ‘फिल्म’ अथवा सिरीयल चालू देणार नाही आणि ती खपवूनही घेतली जाणार नाही, असा कडक इशारा राम कदम यांनी दिला होता.