Chhatrapati Shivaji Maharaj Actor Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासात त्यांच्या आग्र्याहून सुटकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजे औरंगजेबाच्या तावडीत आयते सापडले होते. औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. मात्र महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले आणि परत स्वराज्यात दाखल झाले हा एक मोठा पराक्रमच होता. महाराजांनी नजकैदेत असताना वेगवेगळे डावपेच आखून पुणे गाठलं. आधी प्रकृती ढासळल्याचं सोंग करणे, आग्र्यासह आसपासच्या भागातील ब्राह्मण, साधू-संत व मौलवींना मिठाई व फळे वाटणे, औरंगजेबाच्या सरदारांना लाच देणे आणि शेवटी मिठाई व फळांच्या पेटाऱ्यांमध्ये बसून पळून जाण्यापर्यंतचा प्रवास इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सर्वांनीच वाचला आहे. परंतु, अलीकडेच एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने दावा केला आहे की पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले. या अभिनेत्याचं नाव आहे राहुल सोलापूरकर. राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. दरम्यान, या दाव्यामुळे समाजमाध्यमांवर राहुल यांना ट्रोल केलं जात आहे.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. अभिनेत्री रिमा अमरापूरकर हिने राहुल यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खून व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.

दरम्यान, सोलापूरकर यांनी केलेल्या दाव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी सोलापूरकर यांना समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘टकलू हैवान’ म्हणून घराघरांत ओळख

राहुल सोलापूरकर हे ९० च्या दशकात मराठी चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकांद्वारे घराघरात पोहोचले. ‘नशीबवान’, ‘थरथराट’, ‘पळवा पळवी’, ‘अफलातून’, ‘सूर्योदय’, ‘हम दो बंडलबाज’, ‘भिऊ निकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ आणि ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ अशा अनेक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची पसंती मिळवली. महेश कोठारे दिग्दर्सित ‘थरथराट’मधील त्यांची ‘टकलू हैवान’ ही व्यक्तीरेखा विशेष गाजली. या भूमिकेमुळे आजही महाराष्ट्रातील लोक त्यांना ‘टकलू हैवान’ याच नावाने हाक मारतात.

Story img Loader