मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. आजारपणाला कंटाळल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत…, असं म्हणत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र, त्यांच्या या पोस्टनंतर कलाविश्वातील अनेकांना धक्का बसला असून अनेक दिग्गजांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
“नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलोय. माझं जगणं आता जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलेय. मला त्यात स्वारस्य नाही. तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना करा. नमस्कार……राजन पाटील”, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली. त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. हे दिवसदेखील जातील असं अनेकांनी त्यांना सांगितलं.
राजन पाटील यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर दिग्दर्शक, लेखत सुहास कामत यांनीदेखील राजन यांचं मनोबल वाढवण्याचा आणि त्यांना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. राजन… मित्रा… आजाराविरुद्धचा तुझा लढा हा आम्हा सर्व रंगकर्मींसाठी एक आदर्श होता… आणि तो लढा तू या पुढेही चालू ठेवशील. आम्ही सर्व रंगकर्मी तुझ्यासोबत आहोत. आता तुझ्या मनात दाटलेले निराशेचे ढग तूच तुझ्या सकारात्मक कृतीने दूर सारशील.. औषधोपचार चालू ठेव… तू ही लढाई नक्कीच जिंकशील…अशी कमेंट सुहास कामत यांनी केली.
दरम्यान, राजन पाटील हे मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. अभिनयासोबतच ते उत्तम लेखकदेखील आहेत. रंग माझा, माझ माणसं ही पुस्तक त्यांनी लिहिली आहेत. सोबतच रायगडाला जेव्हा जाग येते,तोची एक समर्थ, तरुण तुर्क म्हातारे अर्क, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच, अशा अनेक नाटक, चित्रपट व मालिकांत त्यांनी काम केले आहे.