बाल कलाकार ते यशस्वी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये वावरणाऱ्या सचिन पिळगावकर यांचा आणखी एक पैलू आहे. तो म्हणजे त्यांचे गाणे. उत्तम अभिनयासोबतच सचिन पिळगांवकर एक उत्कृष्ट गायक असून बऱ्याच वेळा ते सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. विशेष म्हणजे आतादेखील त्यांनी एका गाण्याच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकऱ्यांकडून त्यांना चांगलीच दाद मिळत आहे.
सध्या करोनामुळे देशात लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे या काळात सारेच नागरिक घरी असून त्यांच्या वेळ विविध कामांमध्ये घालवत आहेतं. काही जण छंद जोपासत आहे, काही जण जुन्या आठवणींमध्ये रमत आहे. तर काही जण त्यांच्या वेळ कुटुंबासाठी देत आहेत. यामध्येच सचिन पिळगांवकर त्यांचा वेळ गाण्यांच्या संगतीत व्यतीत करत आहे. त्यांना गाण्याची प्रचंड आवड असून या फावल्या वेळात ते त्यांच्या आवडती गाणी गुणगुणत असल्याचं दिसून येत आहे.
सचिन पिळगांवकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘हिंदुस्तान की कसम’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणं, ‘है साथ तेरे मेरी वफा’ हे गाणं गातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सचिन यांचा हा व्हिडीओ लोकप्रिय होत असून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘हिंदुस्तान की कसम’ या चित्रपटातल्या या लोकप्रिय गाण्याला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा स्वरसाज लाभला आहे. त्याकाळी हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं.