अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. मात्र पहिल्यांदाच ते एका रावडी लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘तू तिथे असावे’या आगामी मराठी चित्रपटात समीर एका डॉनची भूमिका पार पाडणार आहेत.
संतोष गायकवाड दिग्दर्शित ‘तू तिथे असावे’ या चित्रपटामध्ये समीर यांनी ‘बाबा भाई’ या डॉनची भूमिका वठविली आहे. विशेष म्हणजे ही भूमिका साकारत असतानाचा अनुभव नवा आणि वेगळा असल्याचं समीर यांनी सांगितलं.
‘डॉन म्हणजे केवळ भाईगिरी करणारा असल्याचं समज सामान्यत: पाहायला मिळतो. मात्र या चित्रपटामध्ये चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट असा स्वभाव असलेला डॉन मी साकारत आहे. या चित्रपटासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली असून ग्रे शेडची भूमिका करताना मेकअप, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं’, असं ते समीर यांनी सांगितलं.
पुढे ते असंही म्हणाले, ‘भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्यामुळे पहिल्यांदाच ही वेगळी भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला’.
दरम्यान, ७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात समीर यांच्यासोबत भूषण प्रधान, पल्लवी पाटील, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार स्क्रिन शेअर करणार आहेत.