अभिनेता संदीप पाठक फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेतलेला असो वा चाहत्यांशी आदराने बोलणं असो यामधून संदीपची माणूसकी दिसून आली. इतकंच नव्हे तर इतर सामान्य व्यक्तींप्रमाणेच तो स्वतःला मानतो. त्याचा नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडीओ याचंच एक उत्तम उदाहरण आहे. श्रीरामपूर ते मुंबई प्रवासादरम्यानचा व्हिडीओ संदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

श्रीरामपूरहून मुंबईला जात असताना गरमागरम कुरकुरीत वेफर्स हा बोर्ड संदीपला दिसला आणि त्याने गाडी थांबवली. रस्त्यालगत एक छोटसं दुकान आणि त्या दुकानामध्ये केळ्याचे वेफर तळणारी अगदी सामान्य कुटुंबातील व्यक्ती पाहून संदीपला व्हिडीओ काढण्याचा मोह आवरला नाही. त्याने स्वतः वेफर तळायला सुरुवात केली. त्याचबरोबरीने या दुकानाची माहितीसुद्धी या व्हिडीओच्या माध्यमातून दिली.

पाहा व्हिडीओ

“नमस्कार राम राम मंडळी. मी आता श्रीरामपूरहून मुंबईला जात आहे. जाता जाता इथे रस्त्यावर मला एक बोर्ड दिसला. गरमागरम कुरकुरीत वेफर्स असं त्या बोर्डवर लिहिलं होतं. मी हा बोर्ड पाहून लगेचच गाडी थांबवली. संजू लोहार यांचं हे दुकान आहे. गरमागरम वेफर तळताना पाहून ते खायची इच्छा होते. श्रीरामपूरच्या बाहेर पडल्यानंतर लगेचच रस्त्याच्या कडेला हे त्यांचं छोटसं दुकान आहे.” असं संदीप या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, साधेपणा पाहून चाहत्यांनीही केलं कौतुक

संदीपने स्वतः या दुकानामध्ये उभं राहून वेफर तळले. तसेच तुमचा व्हिडीओ आता मी सोशल मीडियावर व्हायरल करणार असंही संदीप या व्हिडीओमध्ये त्या दुकानदाराला बोलताना दिसत आहे. संदीपचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. आपल्या मातीतील कलाकार, तुम्ही अगदी उत्तम काम केलं यालाच म्हणतात माणूसकी अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader