अष्टपैलू अभिनेता सुनील तावडे यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची ४० वर्षं नुकतीच पूर्ण केली. आजवरच्या वाटचालीत त्यांनी असंख्य भूमिका केल्या. नाटक, चित्रपट, मालिका अशा माध्यमांतून मुशाफिरी केली आहे. स्टार प्रवाहच्या दुहेरी मालिकेतील परसू ही त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीविषयी सुनील तावडे यांच्याशी साधलेला संवाद…
मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात तुम्ही ४० वर्षांचा टप्पा गाठला आहे. याबद्दल तुमची भावना काय?
– १९७७ मध्ये माझ्या करिअरची सुरुवात झाली. ‘नटसम्राट’ या नाटकानं माझा रंगभूमीवर प्रवेश झाला. मला गॉडफादर वगैरे कुणीच नाही. मी एकटाच होतो. माझ्या कॉलेजमध्ये प्राध्यापकांनी माझी ओळख करून दिली होती. गेल्या चाळीस वर्षांमध्ये मी खूप व्यस्त झालो. या इंडस्ट्रीनं मला खूप काही दिलं. माझ्या कटुंबाला तितका वेळ देता आला नाही. मात्र, या क्षेत्रातील मित्रमंडळीचं मिळून माझं एक वेगळंच कुटुंब तयार झालं. जीवाला जीव देणारे मित्र मिळाले. या क्षेत्रानंच मला माझ्या आयुष्याची जोडीदार दिली. माझी पत्नीही याच क्षेत्रात आहे. या क्षेत्रात मला भाऊ मिळाले, सुहास ताई, भारती ताई मला आईसमान आहेत. आपण खूप संवेदनशील असल्यानं कलाकार होतो. हे क्षेत्र मला इतकं प्रिय आहे, म्हणूनच मी माझ्या मुलांनाही या क्षेत्रात आणलं. अर्थात, त्यांचीही आवड होतीच. पण मी त्यांना कुठेही अडवलं नाही.
आजवरच्या कारकिर्दीतल्या कुठल्या भूमिका तुम्हाला अविस्मरणीय वाटतात?
– मला माझी प्रत्येक भूमिका अविस्मरणीय वाटते. प्रत्येक भूमिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ होती. त्या भूमिका साकारताना मी त्याचा मनापासून विचार केला होता. त्यातले बारकावे शोधले. आपल्या मुलांमध्ये आपल्याला हा आवडता, हा नावडता असं नाही ठरवता येत. तसंच मला माझ्या भूमिकांमध्ये उजवं डावं नाही करता येणार. त्यातही सांगायचं झालं, तर स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेतली परसू ही भूमिका मला खूप आवडते. या एकाच भूमिकेत मला दहाहून अधिक व्यक्तिरेखा करायला मिळाल्या.
तुमच्या आजवरच्या कारकिर्दीतले काही गंमतीदार किस्से सांगाल?
– खूप किस्से घडले आहेत. एकदा मी स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका करत होतो. त्यात मला समोरच्यावर बंदूक रोखायची होती. मात्र, खिशातून बंदूक काढताना ट्रिगरवर बोट गेलं आणि बंदूक बाहेर यायच्या आधी खिशातच गोळी उडाली. एका नाटकात काम करताना मी एक संवाद विसरलो. पुढचे पंधरा सेकंद रंगमंचावर शांतता होती. त्यावेळी माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं होतं. मंचावरच्या सहकलाकारांचं धाबं दणाणलं होतं. मात्र, मला पुढचं वाक्य आठवलं आणि वेळ मारून नेली.
बॅरिस्टर या नाटकात मी बावीस वर्षांचा असताना ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका केली होती. त्या नाटकातला एक किस्सा आहे. माझी भूमिका संपल्यानंतर मी कपडे बदलून पुढे प्रेक्षकांत येऊन उभा राहिलो. विक्रम गोखले मंचावर आले. त्यांच्या हातातल्या कंदिलाला काहीतरी धक्का लागला आणि काच फुटून मंचावर पसरल्या. आता त्या काचा गोळा कोणी करायच्या असा प्रश्न होता. नाटकात मी रावसाहेबांच्या म्हणजे विक्रम गोखलेंच्या नोकराची भूमिका करायचो. आता करायचं काय अशी परिस्थिती होती. त्यावेळी कोणीतरी बोललं की सुनीलला बोलवा. मी आत जाऊन परत सगळा मेकअप केला, कपडे घातले आणि आधीचंच बेअरिंग घेऊन मी मंचावर प्रवेश केला. मंचावरच्या काचा गोळा केल्या आणि परत निघून गेलो. लोकांचं निरीक्षण करून माझ्यातला नट घडला. मी जिथे जातो, तिथं लोकांचं निरीक्षण करतो. त्याचा फायदा मला भूमिका करताना होतो.
या क्षेत्रात तुमचे मार्गदर्शक कोण?
– माझी सुरुवातच झाली विजया मेहता यांच्याकडे. मी त्यांच्यामुळेच घडलो. त्यांच्या दिग्दर्शनात मी बॅरिस्टर हे नाटक केलं.
विनोदी अभिनेता म्हणून तुम्ही ओळख निर्माण केल्यानंतर स्टार प्रवाहच्या दुहेरी या मालिकेतली परसू ही खलनायकी भूमिका का करावीशी वाटली?
– मी आजवर अनेक विनोदी भूमिका केल्या. खरंतर विनोदी भूमिकांनी माझं घर चालवलं. माझी गंभीर भूमिका असलेल्या नाटकांनी मला तितका आर्थिक फायदा झाला नाही. तरूण तुर्क म्हातारे अर्क, लग्नाची गोष्ट, लेकुरे उदंड झाली, एकदा पहावं करून अशा नाटकांतून विनोदी भूमिका केल्या. त्यातून मला आर्थिक फायदा झाला. त्यामुळे मी विनोदी भूमिकांमध्ये रमलो. एकावेळी एकसूरीपणा आल्यासारखं वाटू लागल्यावर मी वेगळं काम शोधू लागलो. त्यावेळी ‘दुहेरी’तली परसूची भूमिका माझ्याकडे चालून आली. त्याचाही एक किस्सा झाला होता. माझी आधीची मालिका संपल्यानंतर मजा म्हणून मी जरा दाढीमिशी वाढवली. केस कलर केले होते. त्यावेळी मला संजय जाधव यांचा फोन आला. माझा तेव्हाचा गेटअप ‘दुहेरी’तल्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं आणि माझी निवड झाली. तेव्हापासून माझा त्या भूमिकेसाठीचा अभ्यास सुरू झाला. गरज म्हणून मी विनोदी भूमिका केल्या. माझ्या भूमिका प्रेक्षकांनाही आवडत होत्या. मात्र, माझी आवड गंभीर भूमिकांचीच होती. ती आता भागवली जात आहे. तेही काम प्रेक्षकांना आवडतंच आहे. अखेरीस प्रेक्षकांना जे आवडतं, तेच काम आपण करायला हवं.
नव्या कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल?
मनोरंजन क्षेत्राला खूपच लाईटली घेतलं जातं. इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रात जाण्यासाठी जसा अभ्यास लागतो, तसाच या क्षेत्रात येतानाही खूप अभ्यास असावा लागतो. दुसरं म्हणजे, तुमच्यात खूप संयम आणि निरीक्षण क्षमता असली पाहिजे. आता एखाद्याला विचारलं, पेंटिंग येतं का, तर तो नाही म्हणतो. गाता येतं का विचारलं, तर गाता येत नाही म्हणतात. मात्र, अभिनय विचारल्यावर तो सगळ्यांना येत असतो. तो कसा येतो हे माहीत नाही. कुठे काम केलं असं विचारलं, तर कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये काम केलंय, घरी करतो वगैरे सांगितलं जातं. हे क्षेत्र इतकं सहजसोपं नाहीये. मेहनत करायची तयारी असेल आणि समर्पण भावना असेल, तरच या क्षेत्रात या. त्याशिवाय बऱ्याच गोष्टी नशिबावरही अवलंबून आहेत. त्यामुळे यश कधी मिळेल, याचा विचार न करता काम करत राहिलं पाहिजे. टिकून राहणं महत्त्वाचं आहे.