काही दिवसांपूर्वी ‘झी चित्र गौरव २०२५’ पुरस्कार सोहळा पार पडला. त्यानंतर नुकताच ‘झी नाट्य गौरव २०२५’ पुरस्कार सोहळा झाला. या सोहळ्यात अनेक नाटक आणि कलाकारांना गौरविण्यात आले. अभिनेता सुव्रत जोशीने ‘झी नाट्य गौरव २०२५’चे दोन पुरस्कार पटकावले. याबाबत सुव्रतने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित पत्नी सखी गोखलेचं कौतुक केलं आहे.

सुव्रत जोशीला ‘वरवरचे वधू वर’ नाटकासाठी ज्युरी विशेष गौरव अभिनेता व्यावसायिक नाटक आणि सर्वोत्कृष्ट जोडी या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. अभिनेत्याने या पुरस्कारांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तसंच पत्नी सखी गोखलेबरोबरचादेखील फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत सुव्रतने लिहिलं, “काल ‘वरवरचे वधू-वर’साठी ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाले. लहानपणापासून पुरस्कार सोहळ्यात ‘समीक्षक निवड पुरस्कार’चे जास्त आकर्षण होते. त्यात मनोज वाजपेयी, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्धिकी यांसारख्या नटांची वर्दी असायची. माझ्यासारख्या काहीही पार्श्वभूमी नसलेल्या, साधारण व्यक्तिमत्वाचे नट देखील काहीतरी करू शकतात हे बळ त्यातून मिळायचे. याआधी पॉप्युलर कॅटेगरीमध्ये काही पुरस्कार मिळाले. पण कालचा सर्वोत्कृष्ट अभिनेता लक्षवेधी कामगिरी हा पुरस्कार हा अधिक जवळचा वाटला. त्याबरोबरच माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती, माझी आयुष्यातील भागीदार, जोडीदार, खोलवरची वधू सखी गोखले हिच्याबरोबर सर्वोत्तम अनुरूप जोडीदार पुरस्कार देखील मिळाला. माझे ‘वरवरचे वधू वर’मधील काम तिच्यामुळे परिपूर्ण होते. संपूर्ण नाटक हे ज्या ताकदीने ती पेलून धरते ते मला कधी कधी स्तिमित करते”.

“त्याचबरोबर ‘ठकीशी संवाद’साठी मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे नामांकन मिळाले. माझी सहकलाकार आणि अतिशय गुणी अभिनेत्री गिरिजा ओक हिला याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावेळी नाटक निर्मितीत अधिक खोलवर शिरून ‘वरवरचे वधू वर’ हे नाटक अधिकाधिक परिणामकारक रित्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा प्रयत्न आहे. आता तुम्हीही पाठ थोपटायला आणि आनंद घ्यायला नाट्यगृहात लवकर या,” असं सुव्रत जोशीने लिहिलं आहे.

दरम्यान, सुव्रत जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो ‘छावा’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात सुव्रतने कान्होजी शिर्केंची भूमिका साकारली आहे. त्यामुळे चित्रपटातील त्याच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.

Story img Loader