प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास व्यक्तीच्या येण्याने आणि त्यांच्या सहकार्याने बऱ्याच गोष्टी सुकर होतात. अशा या व्यक्तींचा उल्लेख कधीकधी ‘बापमाणूस’ म्हणूनही केला जातो. आयुष्याच्या या प्रवासात किमान अशी एक तरी व्यक्ती प्रत्येकाच्याच आयुष्यात असते. मुळात त्या व्यक्तींचे स्थान फारच महत्त्वाचे असते. पण, त्यांच्याप्रती असलेली ओढ किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी बऱ्याचदा मिळत नाही. म्हणूनच अभिनेता सुयश टिळकने ही संधी स्वत:च निर्माण करत त्यामध्ये इतरांनाही सहभागी करुन घेतले आहे.
#BaapManus असा हॅशटॅग वापरत सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या आयुष्यातील ‘बापमाणूस’ म्हणजेच त्याच्या वडिलांविषयी लिहिले आहे. या पोस्टमधून त्याने वडिलांबद्दल मनात दडलेल्या सर्व भावनांना वाट मोकळी करुन दिली. #BaapManus या हॅशटॅगची सुरुवात करत सुयशने त्याच्या बाबांचा फोटो पोस्ट करत त्याच्या आयुष्यातील बापमाणसाला मानाचा मुजरा केला आहे. त्यासोबतच त्याने इतरांनाही या हॅशटॅगअंतर्गत प्रत्येकाच्या आयुष्यातील ‘त्या’ बापमाणसाविषयी लिहिण्याचे आणि त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करण्याचे आवाहन केले आहे.
https://www.instagram.com/p/Bboh_yfF1Vo/
https://www.instagram.com/p/BbqYGTcj7u0/
सुयशच्या या पोस्टला लाइक करत #BaapManus ला सोशल मीडियावर अनेकांनीच प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या ‘अंजली’नेही यासंबंधीची एक पोस्ट केली आहे. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटोंचा एक कोलाज पोस्ट करत तिच्या आयुष्यातील बापमाणूस कोण आहे हे सर्वांसमोर उघड केले आहे. अक्षयाने या पोस्टमध्ये तिच्या वडिलांचे आणि दोन मामांचे आभार मानले आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षणी या तिघांनीही आपल्याला पाठिंबा दिला मोलाची शिकवण दिल्याबद्दल तिने त्यांचे आभार मानले.