मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्निल जोशी कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. स्वप्निल हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच त्याने घरपोच खाद्यपदार्थ सुविधा पुरविणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या अॅपबद्दल तक्रार केली आहे. याबद्दल ट्वीट करत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
घरपोच खाद्यपदार्थ सुविधा पुरविणाऱ्या कंपनीमध्ये झोमॅटोचे नाव कायमच आघाडीवर असते. देशातील आघाडीच्या फूड डिलिव्हरी कंपन्यांपैकी एक असलेल्या झोमॅटोच्या अॅपमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. याबद्दल स्वप्निल जोशीने तक्रार केली आहे.
आणखी वाचा : ‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर
स्वप्निल जोशीने काल रात्री ९.४० च्या दरम्यान त्याच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले होते. यात त्याने झोमॅटो अॅपबद्दल तक्रार केली. “झोमॅटो अॅपमध्ये काही बिघाड झालाय का? मला तशी तक्रार जाणवत आहे”, असे त्याने ट्वीट करत झोमॅटोला टॅग केले आहे.
त्यानतंर जवळपास १५ ते २० मिनिटांनी झोमॅटोचे अॅप पुन्हा सुरु झाले. यानंतर तातडीने स्वप्निलने ट्वीट करत तक्रार दूर झाल्याचे सांगितले. पुन्हा सुरु झालं, असे ट्वीट त्यानंतर स्वप्निल जोशीने केले आहे.
या सर्व प्रकारनंतर झोमॅटोनेही याबद्दल ट्वीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. “हॅलो स्वप्निल, आमच्या अॅपमध्ये काही तात्पुरत्या स्वरुपाचा तांत्रिक बिघाड झाला होता. पण आमच्या टेकच्या मित्रांचे धन्यवाद कारण त्यांनी वेळीच यावर उपाय शोधला. यादरम्यान तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि भविष्यात तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याची आशा आहे”, असे ट्वीट झोमॅटोने केले आहे.
आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज
दरम्यान सध्या स्वप्निल जोशी हा झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत काम करत आहे. सध्या ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत तो सौरभ हे पात्र साकारत आहे. त्याच्याबरोबर शिल्पा तुळसकर हे स्क्रीन शेअर करत असून तिने यात अनामिकाची भूमिका साकारली आहे.