वैभव मांगले मराठी चित्रपटसृष्टीतीतलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, आपल्या अभिनयाने, गाण्याने, आणि विनोदी सादरीकरणाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक, टीव्ही, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये वैभव तितक्याच मेहनतीने काम करत आहे. वैभव मांगले मूळचे कोकणातील देवरूखचे, शिक्षण सुरु असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यातच करियर करण्याचे ठरवले मात्र घरची परिस्थिती लक्षात घेता नोकरी करणे बंधनकारक होते.
अभिनयाचे वेड वैभव यांना स्वस्थ बसू देईना, नोकरी करण्यात रस देखील नव्हता. अशातच त्यांनी बीएससीमध्ये पदवी संपादन केली आणि त्यांनी ठरवले की अभिनयाशी निगडित एखादी नोकरी बघावी, यासाठी त्यांनी बीएससीनंतर पुढे बीएडमध्ये शिक्षण घेतले जेणेकरून प्राध्यपकाची नोकरी मिळू शकेल. बीएडचे शिक्षण पूर्ण होताच वैभव नोकरीच्या शोधात होते आणि नेमके ज्यावर्षी ते उत्तीर्ण झाले त्याच वर्षी विद्यापीठाने कंत्राट भरतीवर शिक्षक नेमण्यास सुरवात केली. वैभव पुन्हा पेचात पडले कारण कंत्राट भरतीमध्ये पगार कमी मिळणार, अशातच एके दिवशी त्यांच्या काकांनी त्यांना मुंबईत बोलावले. वैभव यांच्यातील गुणांची पारख त्या काकांनी केली होती. मुंबईला आल्यानंतर वैभव यांचा प्रवास सोपा नव्हता. छोटी मोठी काम करून आज मोठ्या भूमिकेत ते आपल्याला दिसत आहेत.
BLOG: सकारात्मकतेचा बुस्टर डोस ‘संज्याछाया’
अभिनयाशी निगडित एखादे क्षेत्र निवडावं म्हणून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला मात्र तरीदेखील त्यांनी करियर अभिनयातच करूनआपले स्थान निर्माण केले. हा किस्सा खुद्द त्यांनीच जोश टॉक नावाच्या कार्यक्रमात सांगितला आहे. झी मराठीवरील ‘फु बाई फु’मुळे ते टीव्हीवर प्रसिद्ध झाले मात्र त्यांना ओळख मिळाली ती ‘टाईमपास’ या चित्रपटातील ‘शाका’ल या भूमिकेमुळे, त्यांच्या अभिनयाची आणि भूमिकेची चर्चा आजही होते. सध्या ‘अलबत्या गलबत्या’ नाटकातून लहान मुलांचे मनोरंजन करत आहेत. तसेच ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ यासारख्या गाजलेल्या नाटकात त्यांनी काम केले आहे.
करोना काळात ते गावी असताना आपल्यातील कला गुणांना त्यांनी वाव दिला. आपण काढलेली चित्र त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना समोर आणली, तसेच त्याकाळात गरजू व्यक्तींना मदत देखील त्यांनी केली. त्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की प्रत्येकाने सातत्याने रोज कष्ट करत राहिले पाहिजे एक दिवस संधी नक्की आपल्या समोर येते. त्यांचे हे विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत.