मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून अभिनेते विजय पाटकर यांना ओळखले जाते. विजय पाटकर यांनी ८० च्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिन्ही क्षेत्रात काम केले आहे. सध्या ते प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या सर्कस चित्रपटात काम करत आहे. यानिमित्ताने त्यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक आठवण सांगितली आहे.
विजय पाटकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर अनेक चित्रपटात काम केले आहे. यातील अनेक चित्रपटात विजय पाटकर यांनी पोलीस पात्राची भूमिका साकारली आहे. सध्या ते सर्कस या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. यानिमित्ताने नुकतंच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विजय पाटकर यांनी फार वर्षांपूर्वी एका विनोदी मालिकेचे दिग्दर्शन केले होते. या मालिकेत लक्ष्मीकांत बेर्डे हे प्रमुख भूमिकेत होते. त्या काळात विजय पाटकर यांना कामाचे पैसे देणे शक्य नव्हतं. एक दिवस विजय पाटकर हे पैशांबद्दल विचार करत बसलेले असताना लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्याकडे आले. विजय पाटकरांनी पैशाचा विषय काढण्यापूर्वीच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना चिंतामुक्त केले. मी तुझ्याकडे पैसे मागतोय का? असे त्यावेळी ते विजय पाटकरांना म्हणाले. तू जे काय देशील ते मी घेईन, जर तू मला १ रुपया दिलास तरीही मी यात काम करेन, असे त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे विजय पाटकर यांना म्हणाले.
इतकंच नव्हे तर या मालिकेत अभिनेत्री रिमा लागू यांनीही स्क्रीन शेअर केली होती. यावेळी रिमा लागू यांनीही विजय पाटकरांना पैशांबद्दल चिंता न करण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान सर्कस या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनता रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मा हे भूमिकेत झळकणार आहेत. त्याबरोबरच यात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, विजय पाटकर याबरोबर अनेक मराठी कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.