-दिलीप ठाकूर

आजच्या ग्लोबल युगात मराठी चित्रपटात भूमिका साकारत असलेल्या कोणाही ग्लॅमरस आणि महत्वाकांक्षी अभिनेत्रीला एखाद्या सिनेपत्रकाराने प्रश्न विचारला, तुला हिंदी चित्रपटात भूमिका करावीशी वाटते का? हिंदी चित्रपटात भूमिका साकारताना काही बोल्ड दृश्ये देशील का?’ तर अशा प्रश्नांवर ती भडकली अथवा रागावून तिने मुलाखतच आटोपती घेतली तर त्यात अजिबात आश्चर्य नको. पण पूर्वी मराठी चित्रपटात यशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींना हा प्रश्न हमखास केला जाई. तो करायचाच असाच जणू नियम होता आणि त्यादेखील त्याचे उत्तर देत. एक तर त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मुंबईत असूनही खूपच लांब असल्यासारखं वाटे. तेथे कोणी ओळखीचे नाही रे असेही एखादी मराठी अभिनेत्री पटकन बोलून जाई. तसेच तेथील अनेक गोष्टींचा कळत नकळतपणे बाऊदेखील होता. तेथील ‘गले लगाओ’ कल्चरपासून ते मोकळ्या ढाकळ्या फोटो सेशनपर्यंत सगळे कसे अचंबित करणारे होते. मराठी वळणाचे हिंदी हीदेखील ‘न बोलता’ एक अडचण होतीच. पण हिंदी चित्रपटातच एक संवाद असतो ना? “हालात बदलते रहते है” अगदी तसेच होत गेले.

अश्विनी भावेची अतिशय प्रतिष्ठित अशा आर. के. फिल्म बॅनरचा रणधीर कपूर दिग्दर्शित ‘हीना’ ( १९९१) निवड झाल्याची बातमी मराठी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर आली (त्या काळात मराठी वृत्तपत्रांत फक्त शुक्रवारी चित्रपट सदर असे. त्यावरुन या बातमीचे महत्व लक्षात यावे.) वर्षा उसगावकरचे ग्लॅमर, आत्मविश्वास, अभिनय क्षमता यांना हिंदी चित्रपटात स्कोप मिळाला. किशोरी शहाणेने ‘खास हिंदी चित्रपटासाठीच ‘ देखणे फोटो सेशन केले.

आज एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात आणि मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल/प्रगती झाली आहे आणि आता तर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत फार अंतर राहिलेले नाही. अंजली पाटील एकीकडे ‘मन फकिरा’ या मराठी चित्रपटात असतानाच हिंदी चित्रपट (न्यूटनमध्ये होती) तर झालेच पण अगदी दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात (काला) ती भूमिका साकारतेय. भाषेच्या कोणत्याही प्रकारच्या मर्यादा न ठेवता अनेक भाषांतील चित्रपटात भूमिका साकारत तिचे अनुभव विश्व समृद्ध होतोय (मराठी दिग्दर्शकांनीही आपला विचार करावा हो हेही ती सांगते हेही सहज जाता जाता सांगायला हवं.) सोनाली कुलकर्णीने ( मोठ्या) अशी खासियत कायमच जपत सतत ‘चौकटीबाहेर’ वाटचाल सुरु ठेवलीय, उंचावत नेली. त्यामुळे ती त्या प्रत्येक भाषेतील चित्रपटात (अगदी आता इंग्रजी नाटकातही) त्यातीलच वाटते. ती कुठेच मिसफिट होत नाही अथवा वाटत नाही. हे स्वभावातून आणि सरावातून जमते. एकीकडे असे चित्र तर दुसरीकडे अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटात भूमिका लहान आहे की मोठी असा विचार न करता हिंदी चित्रपटात सातत्य ठेवलंय. त्यातून खूप गोष्टी साध्य होतात. हिंदी चित्रपटसृष्टीच्या संस्कृतीशी ओळख होते. तेथे नवीन चित्रपटाच्या फस्ट लूकच्या इव्हेन्ट्समध्ये भरपूर एक्सपोझर मिळतो. यापासून तेथील स्टार्सशी छान रिलेशन होते. अमृता खानविलकरचा रणवीर सिंगशी असाच दोस्ताना झाला आणि एकदा एकाच स्टुडिओत आपण आहोत हे कळताच ते दिलखुलासपणे भेटले. ‘मलंग ‘चा प्रीमियर आणि कुणाल खेमूच्या भेटीने अमृता खानविलकर केवढी तरी सुखावल्याचे फोटोतील तिच्या देहबोलीत दिसतेय.

हिंदी चित्रपटसृष्टी असे बरेच छोट्या छोट्या गोष्टीतून काही देत असते. अमृता खानविलकर, पूजा सावंत, सई ताह्मणकर यांच्या फोटो सेशनमधील बोल्डपणातील सहजता हे हिंदी चित्रपटसृष्टीचे देणे आहे. सईने ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’, ‘गजनी ‘ इत्यादी हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. ‘हंटर ‘मधील तिच्या धाडसी दृश्याची चर्चा तर होणारच होती. एखाद्या मराठी अभिनेत्रीने हिंदी चित्रपटात थीम आणि व्यक्तिरेखेनुसार एखादे बोल्ड दृश्य दिले की त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देणारा एक वर्ग मराठीत आहे, तसे व्यक्त होताना हा वर्ग कायमच आपण आज ग्लोबल युगात जगतोय हे विसरतो किंवा हिंदी चित्रपटात असे काही गरजेनुसार केले तर तो व्यवसायाचाच एक भाग असतो हेही लक्षात घेत नाही. पूर्वी हा वर्ग वृत्तपत्रे/साप्ताहिके यात पत्रलेखन करायचा, आता सोशल मिडियात ट्रोल करतोय इतकेच. पण आजच्या पिढीतील मराठी अभिनेत्री मानसिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याने या ट्रोल्सना त्या घाबरत नाहीत. तेवढी मॅच्युरिटी त्यांच्यात आहे.

सई ताह्मणकर ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात क्रीती सनॉनसोबत भूमिका साकारतेय आणि जयपूर येथील शूटिंगमध्ये ती हिंदीच्या युनिटमध्ये छान रमलीय. असे मिक्सअप होणे चित्रपट या व्यवसायाचा एक भाग आहे. त्यातून आणखीन काही हिंदी चित्रपटात भूमिका मिळूही शकते. आपण हिंदी चित्रपटात भूमिका साकारण्यास इच्छुक आहोत हे तेथे सतत दिसत राहिल्यानेही अधोरेखित होत असते. मग ते इंग्रजी मिडियातील पब्लिसिटीनेही साध्य होऊ शकते अथवा हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या इव्हेंट्समध्ये ग्लॅमरस रुपात वावरुनही शक्य असते. तसा हा एकूणच शो बिझनेस. त्यात गुणवत्ता सेफर साईट. ती मराठी कलाकारात आहे यावरचा हिंदी चित्रपटसृष्टीचा दीर्घकालीन विश्वास आहे. तर हिंदी चित्रपटसृष्टीत सेक्रेटरी अथवा मॅनेजर महत्वाचा आहे, हेही मराठी स्टार्स जाणून आहेत. कधी निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या सतत भेटीगाठी घ्यावा लागतात, तेव्हा ‘मिलते रहो’ असेही आश्वासन मिळत राहते.

प्रत्येक क्षेत्राचे काही फंडे असतातच, ते नाकारुन चालत नाही. कधी एखाद्या हिंदी चित्रपटासाठी आपले भरपूर सीन्स चित्रीत होतात, पण प्रत्यक्षात तो चित्रपट पडद्यावर येतो तेव्हा आपल्याच भूमिकेची वाट पाहावी लागते ( कधी त्याची वाटच लागलेली असते) पण अजिबात निराश न होता हिंदी चित्रपटात नक्कीच एकादी चांगली भूमिका मिळेल याच आशेवर रहावे लागते. स्मिता तांबेला ‘पंगा ‘मध्ये मिळाली. तर ‘गली बॉय ‘मधील अभिनयासाठी पुरस्कार प्राप्त झाल्याने अमृता सुभाषने ट्वीट करीत आपला आनंद व्यक्त केला. याच चित्रपटाची ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड झाल्याचाही आनंददायक अनुभव अमृता सुभाषने घेतलाय. तो चित्रपट नामांकन मिळवू शकला नाही हा भाग वेगळा. ‘जंगली’ या हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्याने पूजा सावंतचे प्राणी पक्ष्यांबद्दलचे प्रेम वाढीला लागलेय. तिचा फोटो सेशनचा धडाका कमालीचा आहे ही ऊर्जा हिंदी चित्रपटसृष्टीत वावरताना येतेच. सोनाली कुलकर्णीपासून (तिने सिंघम रिटर्न्स इत्यादीत भूमिका केलीय) वैदही परशुरामीपर्यंत ( सिम्बा) अनेक मराठी अभिनेत्रीनी हिंदी चित्रपटात भूमिका साकारताना तेथील बड्या स्टार्ससोबतचे अनुभव आपल्या मुलाखतीत रंगवून खुलवून सांगितले आणि मराठी फॅन्सना ते आवडले. तेजश्री प्रधान ‘बबलू बॅचलर ‘मध्ये शर्मन जोशीसोबत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचीही चर्चा रंगलीय. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्याने अनेक मराठी अभिनेत्रीना स्टारडम म्हणजे काय याची जाणीव आणि ओळख झाली, आत्मविश्वास वाढला. आणि त्याचा त्यांना मराठी चित्रपटात भूमिका साकारताना कळत नकळतपणे फायदा होतोय. हिंदी चित्रपटसृष्टीचा एकूणच माहौल व्यक्तिमत्वात सुखद बदल घडवणारा आहे आणि आजच्या व्यावसायिक जगात तर ते आवश्यक आहेच.

Story img Loader